पाकिस्तानी पंच असद रौफ यांनी आंतरराष्ट्रीय सामन्यांपूर्वी खेळपट्टी आणि हवामानाबद्दलची माहिती सट्टेबाजांना दिली असण्याची शक्यता मुंबई पोलिसांनी वर्तविली आहे. 
आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजीच्या प्रकरणात सट्टेबाजांनी रौफ यांच्यासाठी गिफ्ट पाठविल्याची माहिती विंदू दारा सिंगने पोलिसांना दिली होती. त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने रौफ यांचे नाव चॅम्पियन्स ट्रॉफीमधून वगळले. रौफही तात्काळ भारत सोडून पाकिस्तानला पळून गेले.
आयपीएल सामन्यांबरोबरच भारतात किंवा भारताबाहेर होणाऱया आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी खेळपट्टीबद्दल आणि हवामानाबद्दल खात्रीशीर माहिती देऊ शकेल, अशी कोणीतरी व्यक्ती सट्टेबाजांना हवी होती. या व्यक्तीने दिलेल्या माहितीच्या आधारे सट्टेबाज सट्टेबाजी करण्याच्या तयारीत होते. रौफ ही माहिती पवन आणि संजय जयपुरी या सट्टेबाजांना देत होते, अशी माहिती विंदू दारा सिंगने पोलिसांना दिल्याचे गुन्हेशाखेतील सूत्रांनी सांगितले.
आम्ही या सगळ्याची चौकशी करतो आहोत. मात्र, यासंबंधी सखोल माहिती मिळवण्यासाठी रौफ यांची पोलिस कोठडी आवश्यक आहे. सद्यस्थितीत ते पाकिस्तानात गेले असल्याने त्यांना ताब्यात घेणे अवघड असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. एखाद्या सामन्याचा निकाल फिरवण्यासाठी रौफ यांनी एखादा चुकीचा निर्णय दिला होता का, याचीही चौकशी गुन्हेशाखा करते आहे.

Story img Loader