सरसंघचालक मोहन भागवत यांनी ज्ञानवापी मशिदीसंदर्भातील बोलताना ‘‘प्रत्येक मशिदीत शिवलिंग शोधू नका,” असं वक्तव्य केल्याच्या मुद्द्यावरुन एमआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केलीय. भागवत यांचं हे वक्तव्य प्रक्षोभक आणि दुर्लक्षित केले जाऊ नये असं असल्याचं ओवेसी म्हणाले आहेत. “एखादी गोष्ट लोकप्रिय नसताना त्यापासून स्वत:ला दूर सारायचं आणि ती लोकप्रिय झाल्यानंतर स्वीकारायची हा संघाचा जुना डावपेच आहे,” असं ओवेसींनी म्हटलंय. शुक्रवारी ओवेसींनी एकूण १७ मुद्द्यांचा समावेश असणारे काही ट्विट्स केले आहेत. बाबरीच्या आंदोलनानदरम्यानही संघाने आधी आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करु असं म्हटलं होतं, अशी आठवण ओवेसींनी करुन दिली. मात्र कोणत्याही संवैधानिक पदावर नसणाऱ्या मोहन भागवत आणि जे. पी. नड्डांसारख्या व्यक्तींऐवजी पंतप्रधान मोदींनी यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करत १९९१ च्या धर्मस्थळांसंदर्भातील कायद्याच्या आधारे स्पष्ट संदेश द्यावा, अशीही मागणी ओवेसींनी केलीय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोहन भागवत नेमकं काय म्हणालेले?
“ज्ञानवापी मशिदीसंदर्भात जो इतिहास आहे, त्याला आम्ही बदलू शकत नाही. मात्र, त्यावर वाद निर्माण करून दररोज नवनवे पुरावे सादर केले जात आहेत. आम्हाला अयोध्येतील राम मंदिरानंतर कोणतेही आंदोलन करायचे नाही. ज्ञानवापीबाबत मुस्लीम व हिंदूंनी न्यायालयाचा निर्णय मान्य करावा,” असे आवाहन सरसंघचालक भागवत यांनी संघाच्यावतीने नागपुरातील रेशीमबाग मैदानात आयोजित तृतीय वर्ष वर्गाच्या समारोपाप्रसंगी बोलताना केले. सरसंघचालक म्हणाले, “प्राचीन काळात बाहेरून आलेल्यांनी आक्रमणे करून मंदिरे तोडली. त्यामुळे ज्ञानवापीबाबत दोन्ही समाजाने आपसात निर्णय करावा. मात्र, तसे होत नाही. आम्ही राम जन्मभूमी आंदोलनात सहभागी झालो, पण आता कोणत्याही आंदोलनात उतरणार नाही. याप्रकरणी न्यायालय जो निर्णय देईल तो पाळायला हवा.”

“मशिदीत शिवलिंग आढळल्यामुळे ते मंदिर आहे, असे वाटते. दोन्ही धर्माचे पूजाविधी वेगळे असले तरी आपण वेगळे आहोत, असे त्यांनी समजू नये. आपण एकाच देशाचे आहोत, हे लक्षात ठेवावे. दोन्ही समाजाने परस्परांचा सन्मान करावा,” असेही भागवत म्हणाले. “विश्वगुरू बनण्याची ताकद भारतात आहे आणि यासाठी संघ प्रयत्न करत आहे,” असे भागवत यांनी सांगितले.

ओवेसींनी काय उत्तर दिलं?
मोहन भागवत यांचा संघाच्या कार्यक्रमातील एक फोटो पोस्ट करत त्या खाली ओवेसींनी अनेक ट्विट केले आहेत. “हिंदूंची विशेष श्रद्धा असणाऱ्या जागांबद्दल वाद निर्माण करण्यात आले. हिंदूंना मुस्लीमविरोध आवडत नाही. आजच्या मुस्लिमांचे पूर्वज हे हिंदूच होते. स्वातंत्र्यांपासून त्यांना कायम दूर ठेवण्यासाठी ही दरी निर्माण करण्यात आली. त्यामुळेच हिंदूंना त्यांच्या धार्मिक जागांचे पुर्ननिर्माण करण्यात यावं असं वाटतंय,” असंही मत भागवत यांनी व्यक्त केलं.

ओवेसी यांनी भागवतांचा हा दावा खोटा असल्याचं म्हणत भारतामध्ये इस्लाम धर्म हा व्यापारी आणि बुद्धीजीवींमुळे आला. हे सर्वजण इस्लाम धर्म मुस्लीमांनी या भूमीवर केलेल्या आक्रमणांच्या फार पूर्वीच घेऊन आलेले, असं ओवेसींनी म्हटलंय. आजच्या मुस्लिमांचे पूर्वज कुठून आलेत हे सध्या महत्वाचं नाही. जरी त्यांचे पूर्वज हिंदू असले तरी भारतीय संविधानानुसार हे भारतीयच आहेत, असं ओवेसी म्हणालेत. “भागवत यांच्या पूर्वजांनी बळजबरीमुळे बौद्ध धर्मामधून धर्मांतर केलं, असं उद्या कोणी म्हणून लागलं तर काय करणार?”, असा प्रश्नही ओवेसींनी उपस्थित केला.

तेलंगणमधील भाजपाचे प्रमुख बंडी संजय कुमार यांनी दिलेल्या इशाऱ्यासंदर्भातही यावेळी ओवेसींनी प्रतिक्रिया दिलीय. तेलंगणमधील सर्व मशिदींमध्ये उत्खनन करण्यासंदर्भात कुमार यांनी वक्तव्य केल्यावरुन बोलतावना ओवोसींनी, “काहींनी आम्हाला बाबरी द्या इतर कोणत्याही मशिदींनी हात लावणार नाही असं म्हटलेलं. इतरांनी केवळ अयोध्या, काशी आणि मथुरा आणि अनेकांनी मध्यकालीन सर्वच मशिदींचा उल्लेख केला. तेलंगण भाजपाच्या अध्यक्षांनी राज्यातील प्रत्येक मशिदीमध्ये खोदकाम करुन पाहिलं पाहिजे असं म्हटलंय. त्यांचे शब्द तर कागदावर लिहिण्याच्या लायकही नाहीत,” असं ओवेसी म्हणालेत.

संघ आणि भाजपाने बाबरीसंदर्भात दुटप्पी भूमिका घेतल्याचा उल्लेख करत ओवेसींनी, “लालकृष्ण अडवाणींनी बाबरी पतनाच्या दिवसाला सर्वात दु:खद दिवस म्हटलं होतं. मात्र फडणवीस, ठाकरे आणि इतर लोक याचं श्रेय घेण्यासाठी वाद घालत आहेत,” असं एका ट्विटमध्ये म्हटलंय. “विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेआधी अयोध्येचा मुद्दा संघाच्या अजेंड्यावर नव्हता. १९८९ च्या पालनपूरमधील ठरवानंतरच अयोध्या हा संघाच्या अजेंड्याच्या भाग झाला. संघाने राजकीय विषयावर एकाचवेळी दोन वेगवेगळ्या भूमिका घेण्यात निपुणता मिळवलीय. काशी, मथुरा, कुतूबमिनार संदर्भातील विषयांवर बोलणाऱ्या सर्व विदूषकांचा थेट संबंध संघाशी आहे,” असं ओवेसींनी एका ट्विटमध्ये म्हटलंय.

“अन्य एक स्पष्टीकरण म्हणजे संघाचे गुंड आता ना मोदींचं ऐकत ना भागवतांचं. दोघांनाही झुंडबळींचा निषेध केला होता. मात्र त्यामुळे हे प्रकार थांबले का? उलट, त्यांनी रामनवमीच्या यात्रांदरम्यान काय केलं आपण पाहिलं. याचा अर्थ या गोष्टी पुढेही घडत राहणार. हे फक्त ढोंग आहे,” असंही ओवेसी म्हणालेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asaduddin owaisi 17 points on mohan bhagwant why look for shivling comment scsg
Show comments