प्रखर हिंदुत्ववादी म्हणून ओळख असलेल्या आणि वर्षभरापूर्वी तेलंगणा भाजपामधून निलंबित करण्यात आलेल्या टी. राजा सिंह यांचे भाजपाने पुनर्वसन केले आहे. भाजपाने त्यांना गोशामहल या मतदारसंघातून पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. ३० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या तेलंगणा विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपाने तेलंगणामधील ५२ मतदारसंघांसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यामध्ये भाजपाने टी. राजा सिंह यांना गोशामहल येथून तिकीट दिले आहे. पक्षाने निलंबित केल्यामुळे टी. राजा सिंह आतापर्यंत निवडणूक प्रक्रिया आणि प्रचारापासून दूर होते. परंतु, आता त्यांना पक्षाने तिकीट दिल्यामुळे राजा सिंह यांच्या कार्यकर्त्यांमधील उत्साह वाढला आहे.
भाजपाने निलंबन रद्द करून तिकीट दिलं नाही, तर मी अपक्ष म्हणून निवडणुकीला उभा राहीन, अशी घोषणा राजा सिंह यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. तसेच मी अपक्ष म्हणून निवडणूक जिंकलो तर भाजपालाच पाठिंबा देईन, असंही राजा सिंह म्हणाले होते. दरम्यान, भाजपाने आता त्यांचं निलंबन रद्द केलं आहे. पाठोपाठ त्यांना विधानसभेचं तिकीटही दिलं आहे.
भाजपाने राजा सिंह यांचं निलंबन रद्द करून त्यांना विधानसभेचं तिकीटही दिलं आहे. त्यामुळे ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल मुस्लिमीन पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी संताप व्यक्त केला आहे. कारण टी. राजा सिंह यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यामुळे त्यांना मुस्लीम समुदायाच्या रोषाचा सामना करावा लागला होता. तसेच त्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे भाजपाने त्यांचं पक्षातून निलंबन केलं होतं.
हे ही वाचा >> २५ वर्षं भाजपात राहिल्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीनं केला पक्षाला रामराम; अजिबात सहकार्य मिळत नसल्याचं दिलं कारण!
राजा सिंह यांना भाजपाने विधानसभेचं तिकीट दिल्याने संतापलेले ओवैसी म्हणाले, मला खात्री आहे की नुपूर शर्मा हिलादेखील तिच्या वक्तव्याबद्दल बक्षीस दिलं जाईल. लोकांमध्ये द्वेष पसरवणाऱ्या लोकांना भाजपात सर्वात जलदगतीने पदोन्नती मिळते. एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर ओवैसी यांनी म्हटलं आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सर्वात प्रिय व्यक्तिला त्याचं बक्षीस दिलं आहे. मला खात्री आहे नुपूर शर्मालाही तिच्या कामाबद्दल आशीर्वाद मिळेल. मोदींच्या भाजपात द्वेष पसरवणारी भाषणं करून पक्षाचा प्रचार करणाऱ्यांना वेगाने पदोन्नती मिळते.