Asaduddin Owaisi On Sonia Gandhi : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. भाजपाला रामराम करून आलेल्या जगदीश शेट्टार यांचा कर्नाटक विधानसभेसाठी प्रचार केल्यामुळे ओवैसी सोनिया गांधींवर संतापले आहेत. ओवैसी यांनी थेट काँग्रेसच्या विचारधारेवर प्रश्न उपस्थित करत म्हटलं आहे की, सोनिया गांधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) उमेदवाराचा प्रचार करतील, असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं.
ओवैसी यांनी सोनिया गांधी यांना प्रश्न केला की, “हीच तुमची धर्मनिरपेक्षता आहे का? अशा प्रकारे तुम्ही नरेंद्र मोदींशी लढणार आहात का?” एमआयएम खासदार म्हणाले, मॅडम सोनिया गांधीजी, मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती की, तुम्ही कधी आरएसएसच्या लोकांचा प्रचार करण्यासाठी इथे याल असं कधीच वाटलं नव्हतं. जगदीश शेट्टार हे आरएसएसचे आहेत. काँग्रेस वैचारिक लढाईत अपयशी ठरत आहे. ही खूप शरमेची बाब आहे. त्याचवेळी या काँग्रेसचे जोकर, नोकर, गुलाम माझ्यावर आरोप करत असतात.
हे ही वाचा >> “१२ वर्ष काँग्रेसने आम्हाला कधीच…”, नितेश राणेंनी वडिलांसमोर व्यक्त केली खंत
काँग्रेसने हुबळी-धारवाड मध्य विधानसभा मतदार संघतून जगदीश शेट्टार यांना मैदानात उतरवलं आहे. या मतदार संघातून शेट्टार मागच्या निवडणुकीत भाजपाच्या तिकीटावर आमदार झाले होते. दुसऱ्या बाजूला काँग्रेसने मात्र शेट्टार यांची पाठाराखण केली आहे. शेट्टार यांच्या काँग्रेस प्रवेशाचा बचाव करताना काँग्रेस नेत्यांनी दावा केला आहे की, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आरएसएसशी संबंधित असूनही ते धर्मनिरपेक्ष एक व्यक्ती आहेत.