Asaduddin Owaisi पहलगाम या ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतातील २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या पर्यटकांनी निरपराध पर्यटकांवर गोळीबार केला. या घटनेनंतर या भ्याड हल्ल्याचा जागतिक स्तरावर निषेध नोंदवला जातो आहे. तसंच पाकिस्तानवरही कडाडून टीका केली जाते आहे. दरम्यान असदुद्दीन ओवैसी यांनी बिलावल भुट्टोंवर जोरदार टीका केली.

बिलावल भुट्टोंनी काय म्हटलं होतं?

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्यासाठी भारताने काही निर्णय घेतले. त्यातला एक निर्णय सिंधू करार रद्द करण्याबाबतचा आहे. यानंतर बिलावल भुट्टोंनी एक पोस्ट केली. त्यात त्यांनी म्हटलं आहे की भारताने सिंधु करार रद्द करुन पाणी रोखलं तर या नदीतून पाणी नाही तर रक्ताचे पाट वाहतील. भारतीयांचं रक्त या नदीतून वाहिल अशी चिथावणीखोर प्रतिक्रिया बिलावल भुट्टोंनी दिली होती. याबाबत असदुद्दीन ओवैसी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

बिलावल भुट्टोंच्या आईला ठार करणारे दहशतवादी होते मग निष्पाप पर्यटकांना मारणारे चांगले का?-ओवैसी

“बिलावल भुट्टो हे नुकतेच राजकारणात आले आहेत. दहशतवाद्यांनी त्यांच्या आईची गोळ्या घालून हत्या केली. ही गोष्ट समजण्याची आवश्यकता आहे. बिलावल यांच्या आईला मारणारे दहशतवादी आणि आमच्या देशातील निष्पाप लोकांना मारणारे चांगले का? “आय.एस.आय, इसीस किंवा पाकिस्तानमधील इतर दहशतवादी संघटनांना भारतात हिंदू-मुस्लिम वाद व्हावा असे वाटते. काश्मीरमध्ये गैर-मुस्लिम राहू शकत नाहीत, हे त्यांना दाखवायचे आहे. जात-धर्म विचारून मारहाण करणाऱ्यांचा आम्ही निषेध करतो. काश्मिरी आदिलने हिंदू-मुस्लिम असा भेदभाव केला नाही. जर कोणी हिंदू-मुस्लिम करत असेल, तर ते चुकीचे आहे” असंही ओवैसी यांनी म्हटलं आहे.

सरकारने युद्धाचा निर्णय घ्यावा-ओवैसी

“भारत-पाकिस्तान युद्धाचा निर्णय सरकारने घ्यावा. सरकारने दहशतवाद कायमचा संपवावा, अशी आमची मागणी आहे. सरकारला त्यांचे काम करू द्या. पाकिस्तानला एफ.ए.टी.एफ.च्या ग्रे लिस्टमध्ये टाकणे आवश्यक आहे. भारत सरकारने पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये टाकावे, अशी आमची विनंती आहे. भारताला आत्मसंरक्षणासाठी हल्ला करण्याचा अधिकार आहे. असंही ओवैसींनी म्हटलं आहे. शाहिद अफ्रिदीबाबत प्रश्न विचारला असता ओवैसी यांनी कोण आहे हा शहिद आफ्रिदी ? काय या जोकराचे नाव घेत आहात? असे सवालही ओवैसींनी विचारले आहेत.

पाकिस्तानविरोधी कारवाईत आम्ही सरकारच्या बरोबर-ओवैसी

सर्व पक्षीय बैठकीत सरकारला आम्ही सांगितलं आहे की तुम्हाला जी कारवाई करायची आहे ते करा. आता सरकारने काय करायचं ते त्यांनी जरुर करावं आमचा पाठिंबा असेल. पाकिस्तानमध्ये दहशतवादी आहेत. ते सीमा ओलांडून पहलगामपर्यंत आले. २६/११ लाही हे दहशतवादी असेच आले होते. आधी हा हल्ला आम्ही केलेला नाही असंच पाकिस्तानने सांगितलं होतं. पण नंतर मान्य केलं. लोकांचा धर्म विचारुन त्यांना गोळ्या घालणं हे निषेधार्ह आहे. पाकिस्तानबाबत विचारलं असता ओवैसी म्हणाले त्यांना अजून मलेरियावरचं औषध तयार करता आलेलं नाही. अशीही टीका त्यांनी केली.