बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब परिधान करण्यावरून वक्तव्य केल्यानं वादात सापडल्या आहेत. इंडिया टुडे टीव्हीला दिलेल्या एका खास मुलाखतीत तस्लिमा नसरीन यांनी हिजाब, बुरखा किंवा निकाब हे दडपशाहीचे प्रतीक आहेत, असा दावा केला होता. कर्नाटकमध्ये झालेलं हिजाब प्रकरण तापल्यानंतर तस्लिमा नसरीन यांनी हे वक्तव्य केलं होतं. दरम्यान, तस्लिमा यांच्या या वक्तव्यावर एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी प्रतिक्रिया देत त्या द्वेषाचे प्रतीक असल्याचं म्हटलंय.

गुरुवारी इंडिया टुडे टीव्हीला दिलेल्या एका खास मुलाखतीत असदुद्दीन ओवेसी म्हणाले, “…मी इथे बसून द्वेषाचे प्रतीक बनलेल्या व्यक्तीला उत्तर देणार नाही. मी इथे बसून अशा व्यक्तीला उत्तर देणार नाही, ज्याला मी उत्तर देणार नाही ज्याला आश्रय दिला गेलाय आणि जो भारताच्या तुकड्यांवर कोण पडून आहे. जी व्यक्ती आपल्या देशात स्वतःला वाचवू शकली नाही, तिच्याबद्दल मी येथे बसून बोलणार नाही,” असं म्हणत त्यांनी तस्लिमा नसरीन यांना सुनावलं.

तस्लिमा नसरीन यांनी हिजाब प्रकरणावर भाष्य केल्याच्या एक दिवसानंतर असदुद्दीन ओवेसी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. असदुद्दीन ओवेसी यांनी तस्लिमा नसरीन यांच्यावर टीका केली आणि ते म्हणाले, “उदारमतवादी व्यक्ती केवळ त्यांच्या निवडीच्या स्वातंत्र्यात आनंदी आहेत. उदारमतवाद्यांना प्रत्येक मुस्लिमाने त्यांच्यासारखे वागावे असे वाटते. तर, उजव्या विचारसरणीच्या कट्टरवाद्यांची अशी इच्छा आहे, की आम्हाला संविधानाने दिलेली आमची धार्मिक ओळख सोडावी,” अशी सडकून टीका त्यांनी केली.

पुढे ते म्हणाले की, “आज मी इथे बसून भारतीय संविधानाबद्दल बोलेन ज्याने मला निवडीचे स्वातंत्र्य, विवेकाचे स्वातंत्र्य दिले आहे आणि मला माझी धार्मिक ओळख पुढे नेण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. भारत एक धर्मनिरपेक्ष देश आहे आणि कोणीही कोणत्याही व्यक्तीला धर्म सोडण्यास सांगू शकत नाही. भारत हा बहु-सांस्कृतिक, बहु-धार्मिक देश आहे. पण मला कोणीही कसे वागावे हे सांगू शकत नाही आणि कोणीही मला माझा धर्म सोडण्यास, माझी संस्कृती सोडण्यास सांगू शकत नाही,” असं असदुद्दीन ओवेसी म्हणाले.

काय म्हणाल्या होत्या तस्लिमा नसरीन-

एका मुलाखतीत तस्लिमा नसरीन यांनी दावा केला होता की “हिजाब, बुरखा किंवा निकाब हे दडपशाहीचे प्रतीक आहेत. काही मुस्लिमांना वाटते की हिजाब आवश्यक आहे आणि काहींना असे वाटते की हिजाब आवश्यक नाही. परंतु, हिजाबची सुरुवात ७ व्या शतकात काही दुष्कर्मवाद्यांनी केली. कारण त्या वेळी स्त्रियांना लैंगिक वस्तू म्हणून वागवले जात होते. त्यांचा असा विश्वास होता की पुरुषांनी स्त्रियांना पाहिले की त्यांच्या मनात लैंगिक इच्छा जागी होईल. त्यामुळे स्त्रियांनी स्वतःला पुरुषांपासून लपवून ठेवण्यासाठी हिजाब किंवा बुरखा घालावा लागतो.”