मोदी सरकारने जाहीर केलेल्या ‘अग्निपथ’ सैन्य भरतीविरोधात देशभरातील तरुण रस्त्यावर उतरलेत. काही ठिकाणी तरुणांच्या आंदोलनांना हिंसक वळण लागले. यावरून एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीने ओवेसी यांनी मोदी सरकारवर हल्ला चढवला आहे. मोदी सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे देशातील तरुणांनी स्वतःचं तारुण्य उद्ध्वस्त करण्याचा मार्ग निवडला, असा गंभीर आरोप असदुद्दीन ओवेसी यांनी केला. ते शनिवारी (१८ जून) हैदराबादमधील एका सभेत बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

असदुद्दीन ओवेसी म्हणाले, “देशात ठिकठिकाणी तरुण मोदींच्या चुकीच्या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. मोदींच्या चुकीच्या निर्णयामुळे तरुणांनी त्यांचं तारुण्य उद्ध्वस्त करण्याचा एक मार्ग निवडला आहे. आता रस्त्यावर उतरलेल्या किती लोकांचे घरं बुलडोझरने तोडाल? तुम्ही कुणाचं घर तोडावं अशी आमची अजिबात इच्छा नाही. तुम्हाला घरं तोडण्याचा अधिकार नाही.”

“वाराणसीचे पोलीस आयुक्त मुस्लीम तरुणांना आपलं म्हणणार नाही का?”

“मला वाराणसीच्या पोलीस आयुक्तांना विचारायचं आहे की त्यांनी माध्यमांसमोर येऊन आमची मुलं आहेत आम्ही समजून सांगू असं म्हटलं. मग मुस्लीम तरुण तुमची मुलं नाहीत का? वाराणसीचे पोलीस आयुक्त मुस्लीम तरुणांना आपलं म्हणणार नाही का? तुम्ही त्यांना बोलावून का चूक केली हे सांगणार नाही का? तुम्ही हिंसाचार करायला नको होता, तुम्ही आमच्याकडे येऊन तक्रार करायला हवी होती, असं सांगणार नाही का?” असा सवाल असदुद्दीन ओवेसी यांनी केला.

“एक पोलीस आयुक्त आमची मुलं, तुमची मुलं बोलत असेल तर…”

ओवेसी पुढे म्हणाले, “तुम्ही मुस्लीम तरुणांशी असं बोलणार नाही, मात्र अग्निपथ विरोधात झालेल्या हिंसाचारातील तरुणांना आमची मुलं म्हणता. तुम्ही त्यांना स्वतःची मुलं म्हणता, मग आम्ही कोणाचे आहोत? माझं कोण आहे? एक पोलीस आयुक्त आमची मुलं, तुमची मुलं बोलत असेल तर आम्ही कोणाची मुलं आहोत? आम्ही देखील देशाची मुलं आहोत. आमची मुलं देखील या देशाची मुलं आहेत ना.”

हेही वाचा : भारतीय मुस्लिमांचं मुघलांशी कोणतंही नातं नाही, पण मुघल राजांच्या बायका कोण होत्या? : असदुद्दीन ओवेसी

“वाराणसीच्या हिंसाचारातील तरुणांना मिठाई दिली, चांगलं केलं”

“मुल हिंदू असो, मुस्लीम असो, दलित असो, आदिवासी असो, ठाकूर असो, ब्राह्मण असो, यादव असो, ओबीसी असो ते देशाचे आहेत. प्रत्येक तरुण देशाचा मुल आहे. मग तुम्ही त्यांना बोलावून चर्चा केली पाहिजे. तुम्ही किती दिवस अशा भाषेचा वापर करणार? तुम्ही वाराणसीच्या हिंसाचारातील तरुणांना मिठाई दिली, चांगलं केलं. तुम्ही मागील शुक्रवारच्या नमाजच्यावेळी देखील तरुणांना अशा पद्धतीने रोखलं पाहिजे होतं,” असंही ओवेसी यांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asaduddin owaisi criticize modi government over agnipath recruitment scheme pbs