देशात करोनाचा कहर सुरू आहे. जगातील अनेक देश भारताच्या मदतीसाठी येत आहेत. देशातील करोनाच्या दुसर्‍या लाटेत ऑक्सिजन, बेड आणि औषधांची सातत्याने कमतरता येत आहे. दरम्यान, विरोधी पक्ष केंद्र सरकारवर हल्ला करत आहेत आणि आवश्यक वस्तूंची उपलब्धता सुनिश्चित करण्याची मागणी करत आहेत. एआयएमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी देशातील सद्य परिस्थितीसाठी केंद्र सरकारला जबाबदार धरले. करोनामुळे आपल्या प्रियजनांना गमावलेल्या लोकांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी, अशी मागणी ओवैसी यांनी केली आहे.

“पंतप्रधान संसद आणि पत्रकार परीषदांना सामोरे जाण्यास घाबरतात. ते स्मशानभूमी आणि कब्रिस्तान बद्दल तासनतास बोलू शकतात, परंतु ते रुग्णालयांबद्दल कधीही बोलू शकत नाहीत. ज्यांनी ऑक्सिजन, बेड्स, औषधांच्या कमतरतेमुळे आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांची मोदींनी माफी मागावी”, असे ओवैसी म्हणाले. 


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशात ३,६६,१६१ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, त्यानंतर संक्रमित लोकांची संख्या २.२६ दशलक्ष ओलांडली आहे. २४ तासांत ३७०० हून अधिक रूग्णांचा विषाणूमुळे मृत्यू झाला आहे.

२४ तासांत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ३ लाख ५३ हजारांवर गेली आहे, ही दिलासाची बाब आहे. आतापर्यंत 1 कोटी 86 लाख 71 हजार 222 लोकांना करोना मुक्त करण्यात आले आहे. देशात सक्रिय रूग्णांची संख्या 37 लाख 45 हजार आहे.