भाजपा पक्षाच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी अवमानकारक टिप्पणी केल्यानंतर भारताला जगभरातून लक्ष्य केलं जातंय. आखाती तसेच काही मुस्लीम राष्ट्रांनी या प्रकरणानंतर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हे प्रकरण आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आल्यानंतर भाजपाने नुपूर शर्मा यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. दरम्यान, एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी भारत सरकार तसेच परराष्ट्र खात्यावर टीका केली असून फक्त नुपूर शर्मा यांच्या अटकेची मागणी केली आहे.
हेही वाचा >> कर्नाटकातल्या उडुपीत रस्त्याला नथुराम गोडसेंच्या नावाचा फलक; गुन्हा दाखल
“या घटनेमुळे भारताची नाचक्की झाली आहे. भारताच्या परराष्ट्र धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. नुपूर शर्मा यांना अटक करायला हवं,” अशी मागणी ओवैसी यांनी केली आहे. तसेच त्यांनी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयालाही लक्ष्य केलं. “भारताचे परराष्ट्र मंत्रालय भाजपा पक्षाचा एक भाग झाले आहे का? आखाती देशांमध्ये भारतीय नागरिकांचा छळ झाला असता तसेच द्वेषपूर्ण वातावरण निर्माण झाले असते तर तुम्ही काय केले असते?” असा सवाल ओवैसी यांनी उपस्थित केला.
हेही वाचा >> अखेर लेयर शॉट कंपनीची माघार, मागितली जाहीर माफी; बॉडी स्प्रेच्या जाहिरातीमुळे झाला होता मोठा वाद
“भाजपा पक्ष प्रक्षोभक वक्तव्ये करण्यासाठी त्यांच्या प्रवक्त्यांना जाणीवपूर्वक पाठवतो. त्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर टीका झाल्यानंतर या प्रवक्त्यांवर कारवाई केली जाते,” असा आरोपदेखील ओवैसी यांनी केला.
हेही वाचा >> प्रेषित मोहम्मद अवमानकारक टिप्पणी प्रकरण : नुपूर शर्मा यांना जीवे मारण्याची धमकी; दिल्ली पोलिसांनी उचललं मोठं पाऊल
“याआधी मी या प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे दाद मागितली होती. मात्र आखाती देशांमध्ये हे प्रकरण गाजल्यानंतरच कारवाई करण्यात आली. याआधीच ही कारवाई करायला हवी होती. त्यांच्या प्रवक्त्याने मुस्लिमांची भावना दुखावणारे वक्तव्य केले आहे; हे समजण्यासाठी भाजपाला दहा दिवस लागले,”असा टोला ओवैसी यांनी लगावला.
हेही वाचा >> प्रेषित मोहम्मद अवमानकारक टिप्पणी प्रकरण : पाकिस्तानने व्यक्त केला निषेध, भारतानेही दिलं प्रत्युत्तर
दरम्यान, भाजपाने नुपूर शर्मा यांना पक्षाच्या प्रवक्तेपदावरुन दूर केले असून त्यांची पक्षातूनदेखील हकालपट्टी केली आहे. नुपूर शर्मा यांच्यासोबत भाजपाचे दिल्ली माध्यमप्रमुख नवीन कुमार जिंदाल यांच्यावरही निलंबनाची करण्यात आली आहे.