गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेचा विषय ठरलेला उत्तर प्रदेशातील कुख्यात गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशर्रफ अहमद या दोघांची शनिवारी रात्री गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांच्या आणि माध्यम प्रतिनिधींच्या गराड्यात असणाऱ्या या दोघांवर हल्लेखोरांनी गोळीबार केला. दोघेही तिथेच ठार झाले. या हत्येप्रकरणी पोलिसानी तीन जणांना अटक केली आहे. दरम्यान, या घटनेवरून उत्तर प्रदेशातल्या विरोधी पक्षांनी राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावर बोट ठेवलं आहे. तसेच देशभरातील इतरही नेते उत्तर प्रदेशमधल्या योगी आदित्यनाथ सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी याबाबतीत आघाडीवर आहेत.
असदुद्दीन ओवैसी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला यासंबंधी प्रतिक्रिया दिली. ओवैसी म्हणाले की, कोण असे जवळ जाऊन गोळ्या मारतात माहितीय का? तुम्ही त्यांची बंदूक चालवण्याची पद्धत नीट पाहा. ज्या पद्धतीने त्यांनी गोळ्या झाडल्या ते पाहा. त्यांचा हात जराही हालला नाही. मलाही बंदूक चालवता येते, एका तज्ज्ञाकडून मीसुद्धा बंदूक चालवण्याचं प्रशिक्षण घेतलं आहे. बंदूक चालवण्याचे धडे मी स्वसंरक्षणासाठी घेतले आहेत. ज्या पद्धतीने त्यांनी अतिकला मारलं, गोळ्या झाडताना त्यांचा हात हलत नव्हता, नजरही स्थिर होती. त्यांचं लक्ष्य ठरलं होतं. कारण ते प्रोफेशल किलर्स (व्यावसायिक मारेकरी – पैसे घेऊन हत्या करणारे) होते, आणि हा एक कोल्ड ब्लडेड मर्डर आहे.
असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, या हत्येत उत्तर प्रदेशमधल्या भाजपा सरकारची किती आणि काय भूमिका आहे आणि ते मारेकरी कोण होते याचा तपास केला पाहिजे. पोलिसांच्या समोर, माध्यमांच्या उपस्थितीत, टीव्हीवर थेट प्रक्षेपण सुरू असताना हे लोक खून करतात. याची चौकशी झाली पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली या प्रकरणाचा तपास व्हायला हवा.
कोर्टात जाऊन न्याय कसा मिळणार? : ओवैसी
दरम्यान, या हत्या प्रकरणावर ओवैसी यांनी ट्विटरच्या माध्यमातून एक प्रतिक्रिया व्यक्त केली. ओवैसी यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, “ज्या समाजात मारेकऱ्यांना हिरो मानलं जातं त्या समाजात कोर्टात जाऊन न्याय कसा मिळणार? न्याय व्यवस्था कशाला हवी अशा समाजात? अतिक आणि त्याचा भाऊ अशर्रफ दोघेही पोलिसांच्या ताब्यात होते. त्यांना हातकडीही बांधण्यात आली होती. मात्र जय श्रीरामचे नारे देत त्यांची हत्या करण्यात आली. योगी सरकारच्या राज्यात कायदा सुव्यवस्था नाकर्ती ठरली आहे. एन्काऊंटर झाल्यावर ज्यांना आनंद साजरा करावासा वाटतो तेच या हत्येला जबाबदार आहेत”