हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपाने दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयासह भाजपाने हरियाणात तिसऱ्यांदा सत्तास्थापनेच्या दिशेने पाऊल टाकलं आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत काँग्रेसचा विजय होईल, असं अनेकांना वाटत होतं. निकालापूर्वी जाहीर झालेल्या एक्झिट पोलमध्येही काँग्रेसच्या विजयाचे भाकीत वर्तवण्यात आलं होतं. मात्र, काँग्रेसला या निवडणुकीत दारुण पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान, या निकालानंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनीही या निकालावरून काँग्रेसला लक्ष्य केलं आहे.
काय म्हणाले असदुद्दीन ओवेसी?
एनआयशी बोलताना ओवेसी यांनी या निकालासंदर्भात भाष्य केलं. “हरियाणात काँग्रेसला स्वत:च्या नाकर्तेपणामुळे पराभव स्वीकारावा लागला आहे. हरियाणात असे अनेक घटक होते. जे भाजपाच्या विरोधात होते. मात्र, तरीही काँग्रेसला भाजपाला रोखण्यात अपयश आलं. जर अशा परिस्थितीतही काँग्रेस भाजपाला रोखू शकत नसेल, तर ते वेदनादायी आहे”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
“आता भाजपाचा बी टीम नक्की कोण?”
पुढे बोलताना बी टीम असल्याच्या आरोपांवरूनही त्यांनी काँग्रेसला टोला लगावला. “हरियाणात तर आमच्या पक्षाने निवडणूकही लढवली नव्हती. तरीही काँग्रेसला पराभव झाला. आता भाजपाचा बी टीम नक्की कोण? याचं उत्तर काँग्रेसने द्यावं. मुळात अंतर्गत गटबाजीमुळे काँग्रेसचा पराभव झाला आहे. मध्यप्रदेशातही अशाप्रकारे काँग्रेसचा पराभव झाला”, असे ते म्हणाले.
“ईव्हीएमला दोष देणं योग्य नाही”
दरम्यान, या हरियाणातील पराभवानंतर काँग्रेसने ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहेत. याबाबत विचारलं असता, “ईव्हीएमला जबाबदार धरणं सोप्प आहे. ज्यावेळी काँग्रेसचा विजय होतो. त्यावेळी ईव्हीएम चांगली असते. मात्र, पराभव होतो, तेव्हा त्यात दोष असतो. हे योग्य नाही” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
जम्मू काश्मीरच्या निकालावरही दिली प्रतिक्रिया
यावेळी बोलताना त्यांनी जम्मू काश्मीरच्या निकालावरही भाष्य केलं. “जम्मू काश्मीरच्या जनतेने कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात मतदान करत भाजपाचा पराभव केला आहे. मुळात भाजपाला ज्या मिळाल्या आहेत, त्या कशा मिळाल्या याचा विचार करणं आता धर्मनिरपेक्ष लोकांचं काम आहे”, असे ते म्हणाले.
हरियाणात भाजपाला ४८ तर काँग्रेसला ३७ जागांवर विजय
हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपाने ४८ तर काँग्रेसने ३७ जागांवर विजय मिळवला आहे. याशिवाय भारतीय लोकदल पक्षाने २ तर अपक्षांना ३ जागांवर विजय मिळाला आहे. या विजयासह भाजपा आता तिसऱ्यांदा हरियाणात सरकार स्थापन करणार आहे.