नुकत्याच जाहीर झालेल्या संयुक्त राष्ट्राच्या एका अहवालामध्ये भारत २०२३पर्यंत चीनलाही मागे टाकून जगभरातला सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनू शकतो. त्या पार्श्वभूमीवर देशाची लोकसंख्या आणि त्यामध्ये प्रत्येक धर्म, जातीच्या टक्केवारीची चर्चा होऊ लागली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यासंदर्भात वक्तव्य करताना “लोकसंख्या नियंत्रण यशस्वीरीत्या साध्य करण्यासोबतच लोकसंख्येतील असंतुलन घडू देता कामा नये”, असं विधान केलं होतं. त्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असताना एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी योगी आदित्यनाथ यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
योगी आदित्यनाथ काय म्हणाले होते?
संयिक्त राष्ट्राच्या अहवालातील दाव्यावर बोलताना योगी आदित्यनाथ यांनी भारताच्या लोकसंख्येवर टिप्पणी केली होती. भारतात लोकसंख्या नियंत्रण कार्यक्रमाची यशस्वीपणे अंमलबजावणी झाली पाहिजे, हे खरंच आहे. पण त्याच वेळी लोकसंख्येत असमतोल देखील होता कामा नये, असं योगी आदित्यनाथ म्हणाले होते. तसेच, एखाद्या समाजाची लोकसंख्या वाढत राहील आणि आपण इथल्या मूळ रहिवाशांचीच लोकसंख्या जनजागृती किंवा बळजबरीने स्थिर करू, असं देखील योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत.
दरम्यान, याविषयी बोलताना असदुद्दीन ओवेसी यांनी आदित्यनाथ यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. “त्यांच्या स्वत:च्याच आरोग्यमंत्र्यांनी सांगितलंय की देशातील लोकसंख्या नियंत्रण करण्यासाठी कोणत्याही कायद्याची गरज नाही. गर्भनिरोधकांचा सर्वाधिक वापर मुस्लीमच करतात. देशात एकूण जन्मदर हा २०१६मध्ये २.६ होता, तो आता २.३ टक्क्यांपर्यंत आला आहे. जागतिक पातळीवर देशातील लोकसंख्येचं प्रमाण सर्वोत्कृष्ट आहे”, असं ओवेसी म्हणाले आहेत.
“मुस्लीम इथले रहिवासी नाहीत का?”
दरम्यान, मुस्लीम इथले मूळ रहिवासी नाहीत का? असा सवाल ओवेसींनी योगी आदित्यनाथ यांना केला आहे. “मुस्लीम इथले रहिवासी नाहीत का? आपण जर वास्तव पाहिलं, तर भारतात मूळ रहिवासी हे फक्त आदिवासी आणि द्राविडी लोक आहेत”, असं ओवेसी म्हणाले.
“उत्तर प्रदेशमध्ये कोणत्याही कायद्याशिवाय ठरवलेला जन्मदर २०२६ ते २०३०पर्यंत साध्य करता येईल”, असं देखील ओवेसी यांनी नमूद केलं आहे.