जयपूर – मुंबई सुपरफास्ट पॅसेंजर एक्स्प्रेसमध्ये रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) जवानाने चार जणांची हत्या केल्याची घटना दोन आठवड्यांपूर्वी घडली होती. ३१ जुलै रोजी पहाटे ही ट्रेन गुजरातच्या वापी स्थानकातून मुंबईच्या दिशेने निघाल्यावर चेतन सिंह या आरपीएफ जवानाने सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकासह चौघांवर गोळ्या झाडून त्यांना ठार केलं. या जवानाने एक्सप्रेसच्या तीन डब्यांमध्ये फिरून एकूण १२ गोळ्या झाडल्या. त्यानंतर गाडीची चेन ओढून गाडी थांबवली. मीरा रोड स्थानकाजवळ उतरून तो पळून जाण्याच्या बेतात होता. परंतु, त्याचवेळी मीरा रोड येथे तैनात रेल्वे पोलिसांनी चेतन सिंहला अटक केली. या घटनेनंतर काही तासांनी आरोपी चेतन सिंह याची एक चित्रफीत वायरल झाली, ज्यामध्ये तो रेल्वेमधील प्रवाशांना धमकावत होता.
या व्हायरल व्हिडीओमध्ये चेतन सिंह प्रवाशांना म्हणत होता की “अगर वोट देना है, हिंदुस्थान में रहना है, तो मोदी और योगी को दो, और आपके ठाकरे…” तो पुढे काय बोलला ते स्पष्ट ऐकू येत नाहीये. चेतन सिंह पोलिसांच्या ताब्यात असून या व्हायरल व्हिडीओ क्लिपच्या अनुषंगानेही पोलीस तपास करत आहेत.
दरम्यान, जयपूर-मुंबई ट्रेनमधील या हत्याकांडाचा मुद्दा एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी लोकसभेत मांडला. मणिपूरप्रश्नी विरोधकांनी मांडलेल्या अविश्वास ठरावावर मत मांडत असताना ओवैसी यांनी जयपूर-मुंबई ट्रेनमधील हत्याकांड, हरियाणातील दंगली, हिजाबचा मुद्दा आणि मणिपूरमधील हिंसाचारावर भाष्य केलं. ओवैसी म्हणाले, आम्ही मोदी सरकारच्या विरोधात उभे आहोत. आपल्या देशात अलिकडेच जयपूर-मुंबई ट्रेनमध्ये एक हत्याकांड झालं. एका वर्दीतल्या दहशतवाद्याने त्याच्या वरिष्ठांसह चार जणांचा खून केला.
ओवैसी म्हणाले, हा हल्लोखेर रेल्वेच्या डब्यांमध्ये फिरला. त्याने लोकांना पाहून, त्यांचं नाव विचारून, चेहऱ्यावरील दाढी पाहून आणि कपडे पाहून त्यांचा खून केला. हा हल्लेखोर एवढ्यावरच थांबला नाही. तर तो त्यानंतर प्रवशांना म्हणाला, तुम्हाला या देशात राहायचं असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनांच मत द्यावं लागेल.
लोकसभेत बोलत असताना ओवैसी यांनी वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले, मला सरकारला प्रश्न विचारायचा आहे, हे सगळं पाहून तुमचा विवेक का जागृत झाला नाही? तिकडे हरियाणात हिंसाचार सुरू आहे. जाणीवपूर्वक मुस्लीम समुदायाला लक्ष्य केलं जात आहे. मणिपूरमध्ये स्त्रियांवर अत्याचार होत आहे. परंतु, आपले पंतप्रधान त्यावर शांत का आहेत?
जयपूर-मुंबई ट्रेनमधील हल्लेखोराचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ओवैसी यांनी एक ट्वीट केलं होतं. त्यात त्यांनी म्हटलं होतं की हा दहशतवादी हल्ला आहे ज्यात प्रामुख्याने मुस्लिमांना लक्ष्य केलं आहे. नरेंद्र मोदींच्या सातत्याने मुस्लिमविरोधी, चिथावणीखोर भाषणांचा हा परिणाम आहे. आरोपी आरपीएफ जवान हा भाजपाचा आगामी निवडणुकीतला उमेदवार असेल का? त्याच्या जामिनाला सरकारचा पाठिंबा असेल का? सुटल्यावर त्याला हार घातले जातील का? मी जर चुकीचा ठरलो तर मला आनंद होईल.