नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील हापूर येथून नवी दिल्लीस जात असताना वाहनावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर एमआयएमचे खासदार असादुद्दीन ओवेसी यांना केंद्र सरकारने दिलेली झेड दर्जाची सुरक्षा त्यांनी नाकारली आहे.
लोकसभेत याविषयी बोलताना ओवेसी यांनी सांगितले की, ‘माझ्या वाहनावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांवर केंद्र सरकारने कठोर कारवाई करावी. बेकायदा कृत्य प्रतिबंधक कायद्याच्या (यूएपीए) तरतुदींनुसार हल्लेखोरांवर कारवाई करण्यात यावी आणि या देशातील कट्टरतावादाचा अंत करावा.’
मला झेड दर्जाच्या सुरक्षेची गरज नाही. मला ए दर्जाचे नागरिक होण्याची इच्छा आहे. मला जगायचे आहे, बोलायचे आहे. जेव्हा या देशातील गरीब सुरक्षित असतील, त्यावेळीच मी सुरक्षित असेल. माझ्या कारवर हल्ला करणाऱ्यांना घाबरायची मला गरज नाही. सरकार या हल्लेखोरावर ‘यूएपीए’नुसार का कारवाई करत नाहीत, असे ओवेसी यांनी सांगितले. ‘उत्तर प्रदेश सरकारने याप्रकरणी हल्लेखोरांना अटक केली असून त्यांच्याजवळील शस्त्रे आणि वाहन जप्त केले आहे,’ असे वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले. गृहमंत्री अमित शाह हे सोमवारी याप्रकरणी लोकसभेत बोलणार असल्याचे गोयल यांनी सांगितले.