तेलंगणामधील हैदराबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी हे सध्या चर्चेत आहेत. त्यांच्याबरोबर त्यांचे भाऊ आणि आमदार अकबरुद्दीन ओवैसीदेखील चर्चेत आले आहेत. अमरावती लोकसभेच्या विद्यमान खासदार आणि भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा या अमरावतीत मतदान पार पडल्यानंतर आता भाजपा उमेदवारांचा प्रचार करत आहेत. नवनीत राणा यांनी हैदराबादमध्ये ओवैसी यांच्याविरोधात लोकसभा निवडणूक लढणाऱ्या भाजपा उमेदवार माधवी लता यांच्या प्रचारासाठी हैदराबादमध्ये आयोजित प्रचारसभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी ओवैसी बंधूंवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच त्यांनी अकबरुद्दीन ओवैसींविरोधात चिथावणीखोर भाषण केलं. राणा यांच्या चिथावणीखोर भाषणावर आता असदुद्दीन ओवैसी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माधवी लता यांच्या प्रचारसभेत नवनीत राणा ओवैसी बंधूंचं नाव न घेता म्हणाल्या होत्या, “छोट्या भावाने १५ मिनिटांसाठी पोलीस बाजूला करण्यास सांगितलं होतं. मी आज त्यांना सांगू इच्छिते, छोट्या तुला १५ मिनिटं लागत होती. पण आम्हाला फक्त १५ सेकंद लागतील. १५ सेकंदांसाठी पोलिसांना बाजूला केलं, तर छोट्या भावाला समजणारही नाही, कोण कुठून आले आणि कुठे गेले.”

नवनीत राणा यांच्या या वक्तव्यावर खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “१५ सेकंद नव्हे, तर एक तास देतो. तुम्ही काय करू शकता ते सांगा? तुम्ही जास्तीत जास्त अखलाक किंवा मुख्तार अन्सारीबरोबर जे घडलं ते आमच्याबरोबर कराल. तुमच्यात किती माणुसकी शिल्लक आहे, ते मला बघायचं आहे. तुम्हाला वाटत असेल की आम्ही तुम्हाला घाबरू, मात्र तुमचा सामना करण्यासाठी आम्ही तयार आहोत. पंतप्रधान तुमचा, प्रशासन तुमचं, तुम्हाला कोणी अडवलंय? कुठं यायचं ते आम्हाला सांगा…आम्ही येऊ”

पाठोपाठ ओवैसी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्यांनी नवनीत राणा यांच्या वक्तव्याचा उल्लेख केला आहे. तसेच ते म्हणाले, मी काय कोंबडीचं पिल्लू आहे का? तुम्ही फक्त सांगा कुठे यायच, आम्ही तयार आहोत. आमचा धाकटा (अकबरुद्दीन ओवैसी) कोणाच्या बापाला ऐकणार नाही. त्याची समजुत घालणाऱ्याचं नाव असदुद्दीन ओवैसी आहे. मी जर माझ्या भावाला म्हणालो की, मी जरा आराम करतो, तू हे सगळं सांभाळ. मग तुम्हीच (भाजपा) त्याला आवरा. आमचा धाकटा कसा आहे ते तुम्हाला माहितीय का? तो तोफ आहे तोफ, तो सालारचा पूत्र आहे.

हे ही वाचा >> “संविधान बदलाच्या चर्चेचा निवडणूक प्रचारात महायुतीला फटका”, मंत्री उदय सामंत स्पष्टच म्हणाले…

हैदराबाद लोकसभा मतदारसंघावर गेल्या अनेक दशकांपासून ओवैसी कुटुंबाचा दबदबा आहे. १९८४ पासून एआयएमआयएम ही जागा जिंकत आला आहे. असदुद्दीन ओवैसी यांचे वडील सुलतान सलाहुद्दीन ओवैसी पहिल्यांदा येथून खासदार झाले. त्यानंतर सलग पाच वेळा जनतेने त्यांना निवडून दिलं. २००४ मध्ये असदुद्दीन ओवैसी येथून खासदार झाले यंदा ते पाचव्यांदा हैदराबादची लोकसभा निवडणूक लढवत आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asaduddin owaisi reply to navneet rana my younger brother akbaruddin is like cannon asc