AIMIM चे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या घराला काही लोकांनी काळं फासल्याची घटना घडली. दिल्लीतल्या त्यांच्या निवासस्थानाला काळं फासण्यात आलं. दोन दिवसांपूर्वी ओवैसी यांनी खासदारकीची शपथ घेताना जय पॅलेस्टाईनचा नारा दिला होता. त्याचा निषेध नोंदवण्यासाठी हे घडलं असावं अशी शक्यता आहे. या घटनेवरुन ओवैसींनी भाजपाला टोला लगावला. एवढंच नाही तर भ्याड सावरकरांप्रमाणे वागू नका अशी आगपाखडही ओवैसींनी केली आहे.
शपथ घेताना नेमकं काय घडलं?
लोकसभेचं पहिलं अधिवेशन २४ जूनपासून सुरू झालं असून सध्या नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सुरू आहे. या शपथविधीदरम्यान आतापर्यंत अनेक खासदारांनी शपथ घेतली आहे. यावेळी कुणी देवाचं नाव घेऊन शपथीला सुरुवात केली, तर कुणी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांचं नाव घेत खासदारकीची शपथ घेतली. मात्र ओवैसी यांनी शपथ घेताच ‘जय पॅलेस्टाईन’ असा नारा दिला. त्यामुळे अनेकांनी भुवया उंचावल्या. तसंच त्यांचा निषेधही काही जणांनी नोंदवला. तर संजय राऊत यांनी त्यांची पाठराखण करत या नाऱ्यात गैर काय असा प्रश्न विचारला. या घटनेला दोन दिवस उलटण्याच्या आतच ओवैसींच्या घराला काळं फासण्यात आलं. त्यावर आता ओवैसींनी भाजपाला टोला लगावला.
हे पण वाचा- Parliament Session 2024 : शपथ घेतल्यानंतर ‘जय पॅलेस्टाईन’ ही घोषणा का दिली? असदुद्दीन ओवैसी म्हणाले…
काय म्हणाले आहेत ओवैसी?
“माझ्या दिल्लीतल्या निवासस्थानाला काही अज्ञातांनी काळं फासलं. दिल्लीतलं माझं घर कितीवेळा टार्गेट केलं गेलंय याची गणतीच मी विसरलोय. दिल्ली पोलीस अधिकाऱ्यांच्या नाकावर टिच्चून हा प्रकार घडला आहे. त्यांच्याकडे गेलो की ते हतबलता व्यक्त करतात. अमित शाह यांच्या तुमच्या निर्देशांनी हे घडतंय का? ओम बिर्लांनी हे स्पष्ट करावं की दिल्लीत खासदार सुरक्षित नाहीत.” असं म्हणत ओवैसींनी संताप व्यक्त केला.
“दोन गुंड आहेत, ते माझ्या घरावर असे भ्याड हल्ले करतात. मात्र मी यामुळे घाबरणार नाही. सावरकरांप्रमाणे भ्याड वागणं सोडा. हिंमत असेल, पुरुष असाल तर माझ्या समोर या. दगफेक करुन, काळं फासून पळून जाऊ नका. असं आव्हानही ओवैसींनी दिलं आहे.”
असदुद्दीन ओवैसी ज्यावेळी शपथ घेण्यासाठी आले, तेव्हा राधा मोहन सिंह हे पीठासीन अधिकारी म्हणून काम बघत होते. यावेळी त्यांनी असदुद्दीन ओवैसी यांना खासदाराकीची शपथ दिली. मात्र, त्यांनी शपथ पूर्ण करताच, ‘जय भीम’, ‘जय मीम’, ‘जय पॅलेस्टाईन’ असा नारा दिला. त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. तसेच भाजपाच्या खासदारांनी याचा जोरदार विरोध केला. त्यानंतर आता त्यांच्या घराला काळं फासण्याची घटना घडली. या घटनेनंतर ओवैसींनी संताप व्यक्त केला आहे. भ्याड सावरकरांसारखं वागू नका असंही त्यांनी म्हटलं आहे.