Asaduddin Owaisi काश्मीरमधल्या पहलगाम या ठिकाणी २२ एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला. त्यात २६ भारतीयांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर देशभरातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. AIMIM चे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. आम्हाला धमक्या देऊ नका, भारतापेक्षा पाकिस्तान अर्ध युग मागे आहे अशी टीका ओवैसींनी केली आहे. एवढंच नाही तर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानचा आर्थिक कणा मोडून त्यांना धडा शिकवावा असंही ओवैसी म्हणाले आहेत.
काय म्हणाले असदुद्दीन ओवैसी?
“पाकिस्तान भारतापेक्षा अर्धा तास नाही तर अर्धं युग मागे आहे. पाकिस्तानी नेत्यांनी उगाच भारताला धमक्या देऊ नयेत. तुमच्या देशाचं जे बजेट आहे तेवढं आमच्या भारताच्या लष्कराचं बजेट आहे हे विसरु नका. पाकिस्तानकडून वारंवार सांगितलं जातं की त्यांच्याकडे अणु बॉम्ब आहे. तुम्ही लक्षात ठेवा की दुसऱ्या देशात जाऊन निर्दोषांची हत्या कराल तर कुठलाच देश गप्प बसणार नाही.” असं ओवैसी म्हणाले. महाराष्ट्रातल्या परभणी या ठिकाणी असदुद्दीन ओवैसी यांनी वक्फ बोर्डासंदर्भात त्यांची भूमिका मांडली. त्यावेळी त्यांनी पाकिस्तानवर जोरदार टीका केली. २२ एप्रिलला दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. या घटनेचा ओवैसी यांनी निषेध नोंदवला आहे.
धर्म विचारुन गोळ्या झाडल्या गेल्या, तुम्ही कुठल्या धर्माच्या गोष्टी करत आहात?
“धर्म विचारुन पर्यटकांवर गोळ्या झाडल्या, तुम्ही कुठल्या धर्माच्या गोष्टी करत आहात? तुमच्या कृती नरकाहून वाईट आहेत. ISIS चा वारसा पुढे चालवत आहात त्यामुळे आम्हाला शिकवू नका. पाकिस्तान आजच नाही गेल्या अनेक वर्षांपासून भारताच्या कुरापती काढतो आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानचा आर्थिक कणा मोडून त्यांना चांगला धडा शिकवला पाहिजे.” अशीही मागणी ओवैसी यांनी केली.
काश्मीर हा आपल्या देशाचा अविभाज्य भाग-ओवैसी
काश्मीर हा आपल्या देशाचा अविभाज्य भाग आहे. काही टीव्ही चॅनल्सचे अँकर्स हे काश्मिरी नागरिकांच्या विरोधात बोलत आहेत. त्यांना थोडी लाज वाटली पाहिजे. काश्मीर आपलं आहे आणि आपलंच राहिल. भारताचं अभिन्न अंग म्हणजे काश्मीर. आपण काश्मिरी लोकांवर संशय कसा घेऊ शकतो? एक काश्मिरी माणूस होता ज्याने दहशतवाद्यांशी लढताना प्राण गमावले अशा लोकांवर आपण संशय घेता कामा नये असंही ओवैसी यांनी म्हटलं आहे.