संसदेच्या पहिल्या अधिवेशनादरम्यान लोकसभेतील नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सुरू असून एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी ‘जय पॅलेस्टाईन’ म्हणत खासदारकीची शपथ घेतली आहे. त्यांच्या या शपथीनंतर आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, ओवैसी यांनी ‘जय पॅलेस्टाईन’ म्हणताच, भाजपाच्या नेत्यांनी जोरदार विरोध केला.

लोकसभेचं पहिलं अधिवेशन कालपासून (२४ जून) सुरू झालं असून सध्या नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सुरू आहे. या शपथविधीदरम्यान आतापर्यंत अनेक खासदारांनी शपथ घेतली आहे. यावेळी कुणी देवाचं नाव घेऊन शपथीला सुरुवात केली, तर कुणी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांचं नाव घेत खासदारकीची शपथ घेतली. मात्र ओवैसी यांनी शपथ घेताच ‘जय पॅलेस्टाईन’ असा नारा दिला. त्यामुळे अनेकांनी भुवया उंचावल्या.

असदुद्दीन ओवैसी ज्यावेळी शपथ घेण्यासाठी आले, तेव्हा राधा मोहन सिंह हे पीठासीन अधिकारी म्हणून काम बघत होते. यावेळी त्यांनी असदुद्दीन ओवैसी यांना खासदाराकीची शपथ दिली. मात्र, त्यांनी शपथ पूर्ण करताच, ‘जय भीम’, ‘जय मीम’, ‘जय पॅलेस्टाईन’ असा नारा दिला. त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. तसेच भाजपाच्या खासदारांनी याचा जोरदार विरोध केला.

दरम्यान, सध्या इस्रायल-पॅनलेस्टाईन संघर्ष शिगेला पोहोचला असून इस्रायलकडून पॅनलेस्टाईनमधील नागरिकांनी अत्याचार केला जात असल्याचा आरोप केला जातो आहे. त्यामुळे पॅनलेस्टाईनमधील नागरिकांना समर्थन देण्यासाठी ओवैसी यांनी हा नारा दिल्याचं बोललं जात आहे.