ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी काँग्रेस पक्षावर आणि खासदार राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ओवैसी म्हणाले, आम्ही अमेठीला गेलो नाही तरी नवरदेव तिथे लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले. स्मृती इराणी यांनी त्यांना (राहुल गांधी) त्यांच्या वडीलांच्या, आजीच्या, आजोबांच्या मतदारसंघात हरवलं. त्याच मतदारसंघात आम्ही (एआएमआयएम) प्रचाराला गेलो असतो तर काँग्रेस पार्टी किती रडली असती. वर्षानुवर्षे त्यांच्या ताब्यात असलेल्या मतदारसंघात इराणी यांनी त्यांना तिथे हरवलं. आम्ही आमच्या प्रचाराला गेलो नव्हतो तरी हे हरले, आम्ही गेलो असतो तर हे लोक किती रडले असते. तुम्ही तुमच्या आईची, वडिलांची, आजीची सीट वाचवू शकला नाही.
खासदार ओवैसी एवढ्यावरच थांबले नाहीत. ते म्हणाले, राहुल गांधी वायनाड (केरळ) या मतदारसंघातही पराभूत झाले असते. परंतु, मुस्लीम लीगने तिथे त्यांना ३५ टक्के मतं मिळवून दिली. मुस्लीम मतदारांमुळे राहुल गांधी वायनाडमध्ये जिंकले. काँग्रेसची सध्याची परिस्थिती पाहता त्यांच्याकडे आता जे काही मतदार आहेत ते मुस्लीम आहेत. त्यामुळेच काँग्रेस पक्ष मुस्लीम नेतृत्वामुळे त्रस्त आहे.
हे ही वाचा >> “जगभरातील मेडिकल माफियांना…”, सर्वोच्च न्यायालयाच्या कारवाईच्या इशाऱ्यानंतर रामदेव बाबांचं वक्तव्य
तेलंगणा काँग्रेसचे प्रमुख रेवंत रेड्डी यांनी काही दिवसांपूर्वी असदुद्दीन ओवैसी यांच्यावर टीका केली होती. ओवैसी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हातातलं बाहुलं आहे, असं रेड्डी यांनी म्हटलं होतं. या टीकेला उत्तर देताना ओवैसी म्हणाले, काँग्रेस फक्त आपल्या कपड्यांवरुन आणि दाढीवरुन आरोप करत असते, आरोप करायला काही मिळालं नाही की अशा प्रकारे आरोप केले जातात. हे लोक मला कळसुत्री बाहुली म्हणतात. परंतु, मी म्हणतो ती कळसुत्री बाहुली तुम्हीच आहात. भाजपा आणि काँग्रेस यांच्यात काहीच अंतर नाही.