उत्तर प्रदेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे ताजमहाल परिसरात पाणी साचलं आहे. तसेच ताजमहालच्या तीन घुमटांपैकी मुख्य घुमटातून पाण्याची गळती सुरू झाली आहे. गुरूवारी ताजमहाल परिसरातील उद्यानात पाणी साचल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक चर्चांनाही उधाण आलं आहे. यावरून आता राजकीय प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनीही यावरून पृरातत्व विभागाच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले आहेत.
काय म्हणाले असदुद्दीन ओवेसी?
असदुद्दीन ओवेसी यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत यासंदर्भात भाष्य केलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी पुरातत्व विभाग ताजमहलला सावत्र वागणूक देत असल्याचा आरोप केला. ताजमहल हे भारतीय संस्कृतीच्या प्रतिकांपैकी एक आहे. भारतीय पुरातत्व विभाग ताजमहल पर्यटनाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये कमवतो. मात्र, त्यांना ताजमहलची योग्य ती देखभाल करता येत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
पुढे बोलताना त्या पुरातत्व विभागाला टोलाही लगावला. हा तोच भारतीय पुरातत्व विभाग आहे, ज्यांना वक्फ स्मारकं त्यांच्या ताब्यात हवे आहेत. मात्र, ज्या वास्तू आता त्यांच्या ताब्यात आहेत, त्या त्यांना योग्य पद्धतीने सांभाळता येत नाहीत. हे म्हणजे १० वीत नापास झालेल्या विद्यार्थ्याने पीएचडीसाठी अर्ज करण्यासारखा प्रकार आहे, असे ते म्हणाले.
ताजमहलच्या गळतीवर पुरातत्व विभागाचं म्हणणं काय?
आग्रा विभागाच्या पुरातत्व खात्यामधील अधीक्षक प्रमुख राजकुमार पाटील यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले, “ताजमहालमध्ये पाण्याची गळती होत असल्याची बातमी खरी आहे. आम्ही मुख्य घुमटाची तपासणी केली असून पावसामुळे ही गळती होत असल्याचे दिसून आले. तसेच ड्रोन कॅमेऱ्याने आम्ही घुमटाची तपासणी केली आहे.”
याशिवाय आग्रा येथील स्थानिक आणि सरकारमान्य गाईड असलेल्या मोनिका शर्मा यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. ताजमहाल आग्रा आणि संपूर्ण देशाचा अभिमान आहे. ताजमहालमुळे आग्र्यातील हजारो लोकांना रोजगार मिळाला आहे. सरकारने ताजमहालची विशेष काळजी घेतली पाहीजे. कारण येथील लोकांसाठी आणि पर्यटनासाठी ताजमहालचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे, असं त्यांनी दी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले.
दरम्यान, आग्रा येथे तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असून अनेक भागात पाणी साचले आहे. पावसामुळे येथील एक राष्ट्रीय महामार्ग जलमय झाला आहे, काही भागातील शेतात तळे साचले असून पिके वाया गेली आहेत तर शहरात महाग घरे असलेल्या भागातही पाणी साचले आहे.