आसाराम बापूंच्या जामीन अर्जावरील सुनावणी न्यायालयाने बुधवापर्यंत पुढे ढकलली आहे. आसाराम यांनी बलात्काराचा आरोप फेटाळला असून, मुलीच्या वैद्यकीय अहवालात तसे स्पष्ट होत नसल्याचा दावा केला आहे.
आसाराम यांना सोमवारी न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे. अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाचा त्यांच्यावर आरोप आहे. पोलीस प्रसारमाध्यमांच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप आसाराम यांचे वकील के.के. मेनन यांनी केला. दोन तास दोन्ही बाजूंकडून युक्तिवाद झाल्यावर जामीन अर्जाबाबतची सुनावणी बुधवापर्यंत लांबणीवर टाकण्यात आली. सुनावणीवेळी आसाराम यांना जोधपूर येथील मध्यवर्ती कारागृहातून न्यायालयात आणण्यात आले नाही.
इतकी सुरक्षा कशाला?
एका व्यक्तीला अटक करण्यासाठी इतक्या सुरक्षा गरजेची आहे काय, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली. आसाराम यांच्या अटकेसाठी जो मोठा फौजफाटा तैनात करावा लागला त्याचा संदर्भ याच्याशी होता. गेले पाच दिवस दूरचित्रवाणी वाहिन्या एका व्यक्तीसाठी किती सुरक्षा द्यावी लागते ते दाखवत आहेत. त्याची काही गरज नाही, असे न्यायमूर्ती जी.एस. सिंघवी आणि व्ही. गोपाला गौडा यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.

Story img Loader