पीटीआय, शाहजहांपूर
बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसारामच्या जामिनाची मुदत तीन महिन्यांनी वाढवण्यात आल्यानंतर पीडितेच्या वडिलांनी कुटुंबाच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. आसाराम त्यांच्यासोबत कधीही काहीही करू शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या पीडितेच्या वडिलांनी आसारामला वारंवार जामीन मिळाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आणि तो त्याच्या इच्छेनुसार सर्वांवर नियंत्रण ठेवत असल्याचा दावा केला. पीडित तरुणी अल्पवयीन असताना २०१३मध्ये जोधपूर येथील आसारामच्या आश्रमात बलात्कार झाला होता.
गुजरात उच्च न्यायालयाने शुक्रवारी आसारामला हृदयविकाराच्या उपचारांसाठी आणि वयाशी संबंधित इतर आरोग्य समस्यांसाठी तीन महिन्यांसाठी हंगामी जामीन मंजूर केला होता.
‘वकिलांनी विश्वासघात केला’
दरम्यान, आम्ही वकिलाला आक्षेप नोंदवण्यास सांगितले, पण त्यांनी सर्व कागदपत्रे तयार करून ठेवली आणि आक्षेप घेतला नाही. त्यांनी आमचा विश्वासघात केला असल्याचा आरोपही पीडितेच्या वडिलांनी केला. वारंवार विनंती करूनही आमच्या वकिलाने न्यायालयात कोणताही आक्षेप नोंदवला नाही. परिणामी, न्यायालयाने आसारामला पुन्हा तीन महिन्यांसाठी जामीन मंजूर केला. आसाराम तुरुंगातून बाहेर आल्यापासून त्यांचे समर्थक सांगत होते की, ते परत जाणार नाहीत, आता त्यांचे म्हणणे खरे ठरत आहे, असे ते म्हणाले.
आसाराम तुरुंगात होता तो आमचा विजय होता. आता तो स्वत:च्या इच्छेनुसार सर्वांवर नियंत्रण ठेवत आहे. न्यायालय वारंवार आसारामला अंतरिम जामीन देत आहे, आधी सात दिवसांसाठी, नंतर १२ दिवसांसाठी, नंतर अडीच महिन्यांसाठी आणि आता तीन महिन्यांसाठी, याचेच आश्चर्य वाटते. – पीडितेचे वडील