Asaram Bapu Latest News : गुजरात उच्च न्यायालयाने शुक्रवारी बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापू याच्या अंतरिम जामिनाची मुदत तीन महिन्यांसाठी वाढवली आहे. वैद्यकीय कारणास्तव ही मुदत वाढवण्यात आली आहे.

८६ वर्षीय आसाराम बापू याला २०१३ सालच्या बलात्कार प्रकरणात दोषी ठरवण्यात आले होते. त्यानंतर त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय कारणास्तव त्याला ३१ मार्चपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला होता. त्यानंतर आता काही दिवसातच तुरूंगात परतावे लागणार असल्याने गुजरात उच्च न्यायालयाने त्याच्या तात्पुरत्या जामीनाची मुदत ३० जूनपर्यंत वाढवली आहे.

आसाराम बापू यांने उच्च न्यायालयात सहा महिन्यांच्या तात्पुरत्या जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जामध्ये त्याच्या वकिलांनी युक्तिवाद केला होता की, त्याला (आसाराम बापू) डॉक्टरांनी पंचकर्म थेरपी घेण्याचा सल्ला दिला आहे. ही थेरपी ९० दिवसांची उपचार पद्धत आहे.

न्यायमूर्ती इलेश जे व्होरा आणि संदीप एन भट्ट यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने या याचिकेवर सुरुवातीला विभाजीत निर्णय दिला. ज्यामध्ये न्यायमूर्ती भट्ट यांची अंतरिम जामीन देण्यास सहमती नव्हती. पण तिसरे न्यायाधीश न्यायमूर्ती एएस सुपेहिया यांनी जामीन देण्याचा बाजून निकाल दिला.

असाराम बापू याला त्याच्या आश्रमात एका किशोरवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणात जोधपूर न्यायालायाने दोषी ठरवले होते आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. २०२३ मध्ये गुजरात उच्च न्यायालयाने देखील २०१३ मध्ये त्याच्या आश्रमातील एका महिलेवर वारंवार आरोप केल्याप्रकरणी आसाराम बापू याला दोषी ठरवले. वैद्यकीय उपचारांसाठी पुण्याला येण्यासाठी त्याला अनेक वेळा पॅरोल मंजूर करण्यात आला आहे.