Asaram Bapu : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी स्वयंघोषित संत आसाराम बापूला ( Asaram Bapu ) जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. संताचं नाव धारण करुन हैवान बनण्याचं कृत्य पांढरी दाढी आणि कपड्यांच्या आड हा आसाराम करत होता. आता याच आसारामला पाच दिवसांच्या पॅरोलवर मुंबईत आणलं जाणार आहे. २४ तास पोलिसांच्या नजरकैदेत या आसारामला ( Asaram Bapu ) मुंबईत आणलं जाणार आहे. जोधपूर मध्यवर्ती कारागृहातून आसारामला मुंबईजवळच्या खोपोली या ठिकाणी असलेल्या माधवबागमध्ये आणलं गेलं आहे. इथे सात दिवस त्याच्यावर उपचार केले जाणार आहेत.
आसाराम बापूवर खोपोलीत होणार उपचार
आसाराम बापूला ( Asaram Bapu ) इंडिगो विमानाने जोधपूरहून मुंबईत आणण्यात आलं आहे. आसारामसह जोधपूर पोलिसांचे दोन जवान आणि दोन अटेंडट असणार आहेत. आसारामने राजस्थान उच्च न्यायालयात उपचारांसाठी पॅरोल मिळावी म्हणून अर्ज केला होता. ज्यानंतर न्यायालयाने १३ ऑगस्टच्या दिवशी त्याला पॅरोल मंजूर केला. माधवबाग या ठिकाणी पोहचल्यानंतर सात दिवसांचा पॅरोल सुरु होईल असंही न्यायालयाने म्हटलं आहे. तसंच यानंतर जेल ते विमानतळ कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.
हे पण वाचा- पंतप्रधान मोदी ते अटलबिहारी वाजपेयी: लाखो अनुयायी असलेल्या आसाराम बापूच्या साम्राज्याला उतरती कळा कशी लागली?
११ वर्षांपासून आसाराम आहे कारागृहात
११ वर्षांपासून आसाराम बापू ( Asaram Bapu ) लैंगिक अत्याचार आणि शोषणाच्या प्रकरणात शिक्षा भोगतो आहे. आसारामने याआधी अनेकदा पॅरोल मिळावा म्हणून अर्ज केला होता. मात्र त्याला न्यायालयाने पॅरोल मंजूर केला नाही. यावेळी पहिल्यांदाच उपचारांसाठी पॅरोल मागितला गेला आहे. ज्यानंतर न्यायाधीश पुष्प्रेंद भाटी आणि न्यायाधीश मुन्नारी लक्ष्मण यांच्या खंडपीठाने जोधपूरच्या एम्स रुग्णालयाने दिलेल्या अहवालानंतर हा पॅरोल मंजूर केला आहे.
न्यायालयाने पॅरोल मंजूर करताना घातली महत्त्वाची अट
न्यायालयाने आसारामचा पॅरोल मंजूर करताना त्याच्यावर अनेक प्रकारच्या अटी शर्थी घातल्या आहेत. या आदेशात न्यायालयाने म्हटलं आहे की आसाराम बरोबर त्याचे सहाय्यक राहतील, तसंच डॉक्टरची गरज असल्यास डॉक्टरला बोलवण्याची मुभा असेल. मात्र उपचार सुरु असताना कुणीही आसारामला भेटू शकणार नाही. आसारामवरचे उपचार कुठल्याही एका बंद खोलीत होतील. त्याठिकाणी २४ तास पोलिसांचा पहारा असेल. पॅरोलसाठी ५० हजारांचा बाँड आणि २५ हजारांचे दोन जामीन देण्यात आले आहेत. आसारामने त्याच्या प्रवासाचा खर्च स्वतः करावा असंही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.