अल्पवयीन विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून अटकेत असलेले स्वयंघोषित आध्यामित्क गुरू आसाराम बापू यांना सोमवारी येथील सत्र न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. आसाराम यांच्यातर्फे जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार आहे.
आसाराम यांना सोमवारी पोलिसांच्या गराडय़ात येथील जिल्हा व सत्र न्यायालयात आणण्यात आले. सत्र न्यायाधीश मनोजकुमार यांनी आसाराम यांना १५ सप्टेंबपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.
आसाराम यांची प्राथमिक चौकशी झाली असून त्यांना आता पोलीस कोठडीत ठेवण्याची आवश्यकता वाटत नसल्याचे पोलीस उपायुक्त अजय लाम्बा यांनी न्यायालयाला सांगितले. चौकशीत आसाराम सहकार्य करीत असून त्यांच्याविरोधात आमच्याकडे भक्कम पुरावे उपलब्ध असल्याचेही लाम्बा यांनी सांगितले. पोलिसांची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीशांनी आसाराम यांना दोन आठवडय़ांची न्यायालयीन कोठडी सुनावली. या वेळी आसाराम यांच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज सादर केला. मात्र, त्यावर आज, मंगळवारी सुनावणी होणार आहे.
आसाराम यांना मज्जातंतूंचा त्रास होत असल्याच्या वृत्ताचा पोलिसांतर्फे इन्कार करण्यात आला. आसाराम यांचे पुत्र नारायण साई काहीही सांगत असले तरी आमच्याकडील वैद्यकीय अहवालानुसार आसाराम हे ठणठणीत असून त्यांना कोणताही आजार नसल्याचे लाम्बा म्हणाले. ते मानसिक व शारीरिकदृष्टय़ा सक्षम असून तुरुंगात वाढलेले अन्नही व्यवस्थित घेत असल्याचे ते म्हणाले. न्यायालयाच्या सुनावणीनंतर आसाराम यांना येथील बराक क्रमांक-१मधील तुरुंगात बंदिस्त करण्यात आले.
आसाराम बापूंची पौरुषत्व चाचणी ‘पॉझिटिव्ह’
गेल्या शनिवारी रात्री उशीरा आसाराम बापूंना इंदूरमधून अटक करण्यात आली होती. रविवारी जोधपूरमधील न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. यावेळी पोलिसांनी आसाराम बापूंची कसून चौकशी केली. त्याचबरोबर त्यांची पौरुषत्व चाचणीही करण्यात आली. पोलिस कोठडीची मुदत संपल्याने सोमवारी दुपारी आसाराम बापूंना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

Story img Loader