पीटीआय, नवी दिल्ली
बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूची प्रकृती खालावत असल्याने शिक्षेला स्थगिती द्या, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली. त्याचे वय आणि गुंतागुंतीचे आजार लक्षात घेऊन शिक्षा स्थगित करा अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली होती.
आसारामने महाराष्ट्रातील खोपोलीतील माधवबाग हृदय रुग्णालयात उपचार घेण्याचा आपला सल्ला स्वीकारला असल्याचे वरिष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी न्यायालयाला सांगितले. त्यानंतर न्या. संजीव खन्ना, न्या. दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठाने रोहतगी यांना या प्रकरणी राजस्थान उच्च न्यायालयात जाण्याचे निर्देश दिले.
न्या. खन्ना यांनी या खटल्यातील दोषारोप आणि शिक्षेविरुद्ध उच्च न्यायालयासमोरील अपीलाच्या सुनावणीला जाणीवपूर्वक विलंब करण्याच्या आसारामच्या प्रयत्नाकडेही लक्ष वेधले.
रोहतगी यांनी आसारामला अनेकदा हृदयविकाराचा झटका आल्याचे आणि वयाशी संबंधित इतर आजारांसोबतच तो गॅस्ट्रोइंटेस्टाइनल रक्तस्रावासह अॅनिमियाने ग्रस्त असल्याचे सांगितल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या अपीलची जलद सुनावणी करण्याचे निर्देश दिले.
वकील राजेश गुलाब इनामदार यांनी आसारामच्या वतीने याचिका दाखल केली आहे. आसारामने या खटल्यात ११ वर्षे ७ महिन्यांहून अधिक काळ शिक्षा भोगल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले. आसारामला हृदयविकार, अति थायरॉईड, आतडे व जठरात रक्तस्रावासह अशक्तपणा, सौम्य प्रोस्टेटिक हायपरप्लासिया आणि मधुमेह, उच्च रक्तदाब, कोविड-न्यूमोनिया आणि यूरोसेप्सिस यासह अनेक आजारांनी ग्रस्त आहे. त्याच्या हृदयाला ऑक्सिजनयुक्त रक्तपुरवठा कमी होत आहे. त्याची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. त्याचा तुरुंगातच वेदनादायी मृत्यू होण्याची भीती आहे, असे याचिकेत म्हटले होते.