अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी सध्या तुरुंगवास भोगत असलेल्या आसाराम बापूने शुक्रवारी बेमुदत उपोषणाची धमकी दिली. माझ्यावरील अत्याच्याराची सीमा झाली असून, एक दिवस मी सुद्धा सलमान खानप्रमाणे निर्दोष सुटेन, अशी आशा न्यायालयात हजर झालेल्या आसाराम याने माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना व्यक्त केली. यावेळी त्याने माध्यमांना वृत्तपत्राच्या प्रती उंचावून दाखविल्या, ज्यात अभिनेता सलमान खानची ‘हिट अॅण्ड रन’ प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाल्याचे वृत्त होते. माझ्यावरील अत्याचाराने सीमा गाठली असून, माझ्याकडे केवळ बेमुदत उपोषणाचा मार्ग शिल्लक राहिला आहे. उपोषणास बसण्याबाबत मी विचार करत असल्याचे, आसाराम बापू म्हणाला. तहलका प्रकरणात तरुण तेजपाल आणि जयललितांना सूट मिळाल्यानंतर आसाराम बापूचे समर्थक उपोषण करू इच्छित होते. परंतु असे करण्यापासून स्वत: आसाराम बापूने त्यांना थांबविल्याची माहिती आसाराम बापूचे प्रवक्ता नीलम दुबेंनी दिली.
आसाराम मागील दोन वर्षांपासून तुरुंगात आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी १ डिसेंबर २०१३ पासून जोधपूरच्या सेंट्रल जेलमध्ये आसाराम बापू तुरुंगवास भोगत आहे. सत्र न्यायालयाने सलमान खानला शिक्षा सुनावल्यानंतर जेव्हा उच्च न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर केला होता, त्यावेळीदेखील आसाराम बापूचा संताप अनावर झाला होता. त्यावेळी दुरऱ्यांदा राजस्थान न्यायालयाने आसाराम बापूचा जामीन अर्ज फेटाळला होता.

Story img Loader