दिल्लीतील सामूहिक बलात्कार प्रकरणातील तरुणीविषयी मुक्ताफळे उधळून सुजाण नागरिकांच्या रोषास पात्र ठरलेले कथित आध्यात्मिक गुरू आसाराम बापू यांनी मंगळवारी या संपूर्ण वादास प्रसारमाध्यमांनाच जबाबदार धरीत, त्यांच्यावर तोंडसुख घेतले. ही प्रसारमाध्यमे आणि टीकाकार हे भुंकणारी कुत्री आहेत, अशा शब्दांत या संताने त्यांच्यावर टीका केली.
दिल्लीतील बलात्कार प्रकरणातील त्या तरुणीने, देवाचे नाव घेत, सरस्वती मंत्र म्हणत त्या बलात्काऱ्यांचे पाय धरले असते, त्यांना भाऊ म्हटले असते, तर तो प्रकार घडला नसता. त्या प्रकरणास ती तरुणीही काही अंशी जबाबदार आहे, अशा आशयाचे विधान आसाराम यांनी केले होते. त्यावरून संपूर्ण देशभरातून त्यांच्यावर टीका होऊ लागली. परंतु त्या अश्लाघ्य विधानाबद्दल कोणताही खेद वा खंत व्यक्त न करता आसाराम यांनी उलट टीकाकार आणि माध्यमांनाच धारेवर धरले. माध्यमांनी आपल्या विधानाचा विपर्यास केला आहे, असा आरोप त्यांनी केला.
‘संत’वचन
पहिल्यांदा एक कुत्रं भुंकलं. मग दुसरं भुंकलं. आणि मग आजूबाजूची सगळीच कुत्री भुंकायला लागली. आता जर हत्ती त्या कुत्र्यांमागे धावला तर त्यांची किंमत वाढते आणि हत्तीची कमी होते.. तेव्हा त्यांना काय म्हणायचे आहे ते म्हणू द्या. मला त्याची फिकीर नाही..– आसाराम बापू