बलात्कार आणि लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यातील आरोपी आणि स्वयंघोषित संत आसाराम बापूंचा मुलगा नारायण साई याचा शोध घेण्यासाठी गुजरात पोलीसांनी शुक्रवारी बिहारमधील दरभंगा जिल्ह्यातील अरियारी गावातील आश्रमावर छापा टाकला. 
नारायण साई अरियारी येथील आश्रमात लपून बसल्याची माहिती गुजरात पोलीसांना मिळाली होती. त्यामुळे त्यांनी बिहार पोलीसांच्या मदतीने या आश्रमावर छापा टाकला. गुजरात पोलीसांच्या पथकात तीन कर्मचाऱयांचा समावेश होता. संपूर्ण आश्रमात नारायण साईचा शोध घेण्यात आला. मात्र, ते सापडले नाहीत.
नारायण साईचा सहायक कौशल कुमार हा याच गावातील रहिवासी आहे. त्याला पोलीस पथक छापा टाकणार असल्याची माहिती मिळाल्यामुळे त्याने तेथून पळ काढल्याचे सूत्रांनी सांगितले.
सूरतस्थित दोन बहिणींना आसाराम बापू आणि त्यांचा मुलगा नारायण साई यांच्याविरोधात बलात्काराचा गु्न्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यामुळे गुजरात पोलीसांनी काही दिवसांपूर्वी आसाराम बापूंना चौकशीसाठी जोधपूर पोलीसांकडून ताब्यात घेतले. नारायण साईविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार आहे.

Story img Loader