स्वघोषित अध्यात्मिक गुरू आसाराम बापू यांनी ज्या साक्षीदाराची हत्या घडवून आणली, त्याच्या वडिलांनी मुलाच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.
नरेश गुप्ता यांनी त्यांचे पुत्र अखिल यांचा खून स्थानिक वैमनस्यातून झालेला नाहीतर त्याचा संबंध आसाराम बापू यांना चालू महिन्याच्या सुरुवातीला जामीन नाकारल्याशी आहे.
त्यांनी पुढे असा आरोप केला आहे, की आसाराम बापू यांची मुलगी भारती या खुनामागे असावी, कारण तुरुंगातून तीच बाहेर आहे. आपल्या कुटुंबाला जास्त संरक्षण देण्यात यावे, कारण आपल्या मुलाची पत्नीही या प्रकरणात साक्षीदार आहे असेही ते म्हणाले.
दरम्यान, आयपीएस अधिकारी अमिताभ ठाकूर यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना या कुटुंबाची सुरक्षा वाढवण्यास सांगितले आहे. स्थानिक पोलिसांनी केलेल्या चौकशीबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
अखिल गुप्ता (वय ३५) हे आसाराम बापू यांचे माजी खानसामा व सहकारी होते. सुरतमधील बलात्कारप्रकरणी आसाराम बापूंच्या विरोधात ते साक्षीदार होते. त्यांचा जनसाथ रोड येथे खून करण्यात आला. मुझफ्फरनगर येथे ११ जानेवारीला घरी परत जात असताना त्यांना ठार करण्यात आले. गुप्ता यांनी गांधीनगर न्यायालयात आसाराम बापू यांच्याविरोधात साक्ष तर दिली होतीच, त्याशिवाय काही पुरावेही दिले होते. आसाराम बापू यांनी १६ वर्षांच्या शाळकरी मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.