समझोता एक्स्प्रेस आणि देशातील अन्य ठिकाणी घडवण्यात आलेल्या बॉम्बस्फोटांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (आरएसएस) ‘आशीर्वाद’ होता, असा आरोप या स्फोटप्रकरणातील आरोपी स्वामी असीमानंद यांनी केला आहे. ‘हिंदूू दहशतवादी कटा’ला संघाच्या नेतृत्वाचा ‘आशीर्वाद’ असून समझोता एक्स्प्रेस, मक्का मशीद आणि अजमेर शरीफ येथे झालेले बॉम्बस्फोट त्याचाच एक भाग असल्याचा दावा असीमानंद यांनी ‘कॅरॅवान’ या मासिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये केला आहे. संघाने मात्र असीमानंद यांचे आरोप तथ्यहीन व चुकीचे असल्याचे सांगत फेटाळून लावले.
संघाचे प्रवक्ते राम माधव यांनी असीमानंद यांची ही कथित मुलाखत हा विरोधकांनी रचलेला कट असल्याचे म्हटले आहे. अशा प्रकारची कोणतीही गोष्ट घडलेली नाही, असे असीमानंद यांनी यापूर्वी दंडाधिकाऱ्यांसमोर निवेदन दिले आहे. त्यामुळे आताच हा प्रश्न निर्माण होण्यामागे विशिष्ट हेतू असल्याचे वाटते, असेही राम माधव म्हणाले.  असीमानंद यांच्या आरोपाचा अन्य पक्षांनी मात्र राजकीय लाभ उठविण्याचे ठरविले आहे. काँग्रेस आणि बसपासह अनेक पक्षांनी ही गंभीर बाब असल्याचे नमूद करून त्याची योग्य प्रकारे चौकशी करण्याची आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. भाजप आणि शिवसेनेने हे आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे.  
असीमानंद यांनी काय वक्तव्य केले आहे, ते पाहिले पाहिजे. त्यांनी काही गौप्यस्फोट केलाच असेल तर कदाचित ते सत्यही असेल, असे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटले आहे. तर यामागील सत्य बाहेर आले पाहिजे आणि त्यावर चर्चा झाली पाहिजे, असे केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद म्हणाले. हा आरोप गंभीर असल्याने केंद्र सरकारने ही बाब सहजतेने घेऊ नये, असे बसपाच्या मायावती म्हणाल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा