गेल्या वर्षी ३ ऑक्टोबर रोजी लखीमपूर खेरी येथे मोठा हिंसाचार घडला होता. या घटनेत ४ शेतकरी आणि एका पत्रकारासह एकूण ८ जणांचा मृत्यू झाला होता. या हिंसाचारात केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा मुख्य आरोपी आहे. याप्रकरणी आरोपी मिश्रा याला मंगळवारी न्यायालयात हजर केलं. यावेळी न्यायालयात घेऊन जात असताना अशिष मिश्रा कॅमेऱ्यासमोर मिशा पिळताना दिसला आहे. शेतकऱ्यांना चिरडूनही अशा अविर्भावात आल्याने या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियात वेगानं व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आशिष मिश्रा याला मंगळवारी स्वतंत्रपणे न्यायालयात हजर करण्यात आलं. यानंतर अंकित दास, सुमित जयस्वाल यांच्यासह अन्य आरोपींनाही न्यायालयात हजर करण्यात आलं. दरम्यान आशिष मिश्राला न्यायालयात घेऊन जात असताना, तो मिशा पिळताना दिसला आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या समोर आला असून अनेक राजकीय नेत्यांनी त्याच्यावर टीका केली आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
३ ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य त्यांच्या पूर्वनियोजित लखीमपूर खेरी दौऱ्यावर होते. तेथे ते काही सरकारी योजनांचं उद्घाटन करणार होते. त्यासाठी आधी ते हेलिकॉप्टरने येतील असं निश्चित केलं. त्यानंतर अचानक सकाळी प्रोटोकॉल बदलत ते रस्ते मार्गाने लखीमपूर येथे पोहोचले. संयुक्त किसान मोर्चाने उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय गृह राज्य मंत्री अजय मिश्रा टेनी यांच्या या दौऱ्याला विरोध केला होता. त्यांच्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी लखीमपूर आणि उत्तर प्रदेशच्या तराई परिसरातील इतर जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांनाही आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं होतं.
त्यामुळे लखीमपूर खेरी याठिकाणी हजारो शेतकरी जमा झाले होते. यावेळी शेतकऱ्यांनी केंद्रीय गृह राज्य मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आरोपी आशिष मिश्रा याच्या ताफ्याला विरोध केला. शेतकऱ्यांचा वाढता रोष पाहून या ताफ्याने आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर गाडी चढवली. यामध्ये ४ शेतकरी आणि एका पत्रकारासह एकूण ८ जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी आशिष मिश्रा अनेक दिवस फरार झाला होता.