इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबादचे संचालक आशिश नंदा यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. भारतातील प्रतिष्ठित संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयआयएमएच्या संचालक पदाची जबाबदारी त्यांनी साडे तीन वर्षे सांभाळली. त्यांनी आपला राजीनामा आयआयएमएचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांच्याकडे दिला. त्यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे.

आयआयएमएचा पदभार स्वीकारण्यासाठी ते अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठातील नोकरी सोडून भारतात आले होते. सप्टेंबर २०१३ मध्ये त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली होती. आयआयएमला लिहेलेल्या पत्रामध्ये त्यांनी वैयक्तिक कारणामुळे आपण राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. आपल्या पत्नी आणि मुलापासून दूर राहणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे असे ते म्हणाले. राजीनामा देण्याची ही अतिशय योग्य वेळ असल्याचे ते म्हणाले.

कुमार मंगल बिरला यांच्या नेतृत्वात या संस्थेची कामगिरी उत्कृष्ठ होत असल्याचे त्यांनी म्हटले. या ठिकाणी काम करण्याची मला सौभाग्य मिळाले त्यासाठी मी तुम्हा सर्वांचा ऋणी आहे असे त्यांनी म्हटले. ही जबाबादारी सांभाळताना सर्वांचे सहकार्य मिळाल्याबद्दल त्यांनी आपल्या सहकाऱ्यांचे आभार मानले. कुमार मंगलम बिरला यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. गेल्या काही आठवड्यांपासून ते आपल्याशी याबाबत चर्चा करत होते असे ते म्हणाले. त्यांनी दिलेले कारण लक्षात घेऊन आपण त्यांचा राजीनामा मंजूर केल्याचे बिर्ला यांनी म्हटले.

Story img Loader