अलीकडच्या काही महिन्यांमध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन अनेक वरिष्ठ नेत्यांनी भाजपा किंवा भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. महाराष्ट्रातही अनेक नेते काँग्रेसला रामराम करून महायुतीत सहभागी झाले आहेत. यावरून राहुल गांधी यांनी रविवारी (१७ मार्च) एका नेत्याबाबत मोठं वक्तव्य केलं. महाराष्ट्रातील एक वरिष्ठ नेता सोनिया गांधी यांच्याकडे रडला होता, असं राहुल गांधी म्हणाले. ‘भारत जोडो न्याय यात्रे’चा सांगता सोहळा रविवारी मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी राहुल गांधी यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.
राहुल गांधी म्हणाले, “काही दिवसांपूर्वी एका वरिष्ठ नेत्याने काँग्रेस सोडली. मी त्यांचं नाव घेऊ इच्छित नाही. पण ते रडत माझ्या आईकडे आले होते. आईकडे येऊन म्हणाले, सोनियाजी मला लाज वाटतेय. या लोकांविरोधात, या शक्तीविरोधात लढण्याची हिंमत माझ्याकडे नाही. मी तुरुंगात जाऊ इच्छित नाही. असं करणारे ते एकमेव नेते नाहीत. असे हजारो लोक आहेत. ज्यांना घाबरवलं गेलं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेतेही असेच गेले. मी ज्या शक्तीबद्दल बोलत आहे, त्या शक्तीने या लोकांचा गळा पकडून त्यांना भाजपात पाठवलं आहे. त्यामुळे हे सर्व घाबरून गेले आहेत.”
राहुल गांधी यांचा रोख माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे माजी वरिष्ठ नेते तथा भाजपाचे राज्यसभेचे विद्यमान खासदार अशोक चव्हाण यांच्याकडे होता असं बोललं जात आहे. त्यामुळे अशोक चव्हाण यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. अशोक चव्हाण म्हणाले, राहुल गांधींचं वक्तव्य तथ्यहीन आहे.
राहुल गांधींच्या दाव्यावर अशोक चव्हाण काय म्हणाले?
अशोक चव्हाण म्हणाले, राहुल गांधी यांनी कोणाचंही नाव घेतलेलं नाही. राहुल गांधी जे काही बोलले ते माझ्याबद्दल असेल तर ते हास्यास्पद आणि तर्कहीन आहे. कारण मी सोनिया गांधींना कधीही भेटलो नाही. मी सोनिया गांधींना भेटून माझी काहीतरी भावना व्यक्त केल्याचं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं. परंतु, ते वक्तव्य चुकीचं आहे. राहुल गांधी यांचं ते वक्तव्य दिशाभूल करणारे असून त्यात तथ्य नाही. दुसरी गोष्ट म्हणजे, मी काँग्रेस पक्षासाठी शेवटपर्यंत काम केलं आहे. त्यामुळे मी पक्ष सोडेपर्यंत पक्ष सोडण्याची माहिती कोणालाच नव्हती आणि हे वास्तव आहे.
हे ही वाचा >> “अजित पवारांवर आत्ताच भाजपाचा प्रचंड दबाव, विधानसभेला तर…”, रोहित पवारांचं वक्तव्य; म्हणाले, “नुकसानाच्या भितीने अनेक आमदार…”
चव्हाण म्हणाले, मी ज्या दिवशी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्याचवेळी ही माहिती बाहेर पडली. आमदारकीच्या राजीनाम्यानंतर मी पक्ष सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. परंतु, मी राजीनामा देईपर्यंत याबाबतची कोणालाही माहिती नव्हती. त्यामुळे मी अगोदरच सोनिया गांधी यांची भेट घेऊन त्यांना कळवल्याचं जे वक्तव्य राहुल गांधी यांनी केलंय ते चुकीचं आहे. ते वक्तव्य माझ्याबद्दल असेल तर ते हास्यास्पद आणि तथ्यहीन आहे.