– नामदेव कुंभार

१९८९ च्या लोकसभा निवडणुकीत नांदेड मतदारसंघातून डॉ. व्यंकटेश काब्दे यांनी अशोक चव्हाणांचा केलेला पराभव नांदेडातच नव्हे, तर राज्यात लक्षवेधी ठरला. राजकीयदृष्ट्या नवख्या उमेदवाराने तरुण, पण प्रबळ उमेदवाराला हरवून केलेला चमत्कार दीर्घकाळ चर्चेत राहिला. त्यावेळी पडद्याआड घडलेल्या काही बाबींची माहिती तब्बल ३० वर्षांनंतर समोर आल्या आहेत.

वयाच्या तिशीत लोकसभेत पाऊल टाकणारे अशोक चव्हाण आज साठीनंतरही लोकसभेच्या रणांगणांत उतरले आहेत. २०१४ च्या मोदी लाटेतही नांदेडकरांनी अशोक चव्हाणांच्या बाजूने कौल दिला होता. महाराष्ट्रात अशोक चव्हाण काँग्रेसचे दिग्गज नेते म्हणून ओळखले जातात. पण, १९८९ ला त्यांना पराभवाचा झटका बसला होता. त्यावेळच्या जनता दलाच्या व्यंकटेश काब्दे यांनी अशोक चव्हाणांचा पराभव करत देशात खळबळ उडवून दिली होती. लोकसत्ताशी बोलताना काब्दे यांनी त्यावेळी केलेल्या प्रचाराची इत्थंभूत माहिती दिली.

काब्दे म्हणतात, ‘कार्यकर्त्यांचे परिश्रम आणि मतदारांचा प्रतिसादामुळेच १९८९ च्या लोकसभा निवडणुकीत २४ हजार मतांनी विजयी झालो. त्यावेळी मी केवळ सहा लाख रूपये खर्च करून बाराशे पैकी १४० गावांत प्रचार केला. प्रचारासाठी माझ्याकडे काही साधने नव्हती त्यामुळे होईल तसा प्रचार केला. फक्त सहा जीप माझ्या प्रचारासाठी फिरत होत्या. कार्यकर्त्यांचे परिश्रम आणि देशात व्ही. पी. सिंग यांचे नाव चर्चेत होते, शिवाय भ्रष्टाचाराविरोधातली आलेली लाट याच्या बळावर मी ती निवडणूक जिंकली.

१९८९ च्या दरम्यान मी परदेशातील शिक्षण घेऊन नुकताच नांदेडला आलो होतो. घरात कोणताही राजकीय वारसा नव्हता आणि राजकारणाचाही मला गंध नव्हता. मात्र, सामान्य नागरिकाने राजकारणाचा अनुभव घेतला पाहिजे असे मला वाटतं होते पत्नीला मी ही गोष्ट सांगितली आणि ती देखील माझ्या पाठीमागे खंबीर उभी राहिली. त्यामुळे मी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी माझ्याकडे पुरेसा पैसाही नव्हता. पत्नीने बचत केलेले दोन लाख रुपये, मित्रांनी मदत म्हणून दिलेले २ लाख रुपये आणि २ लाख रुपयांचे कर्ज काढून मी लढलो. त्यावेळी प्रचाराची यंत्रणा तोकडीच होती, वाहनेही मोजकीच होती, त्यामुळे कार्यकर्ते जमेल तसे स्वत:च खर्च करून माझा प्रचार करीत होते. मतदारांच्या प्रेमापोटी मी ती निवडणूक जिंकली.

निवडणुकीत राजकारणाची कोरी पाटी असलेल्या डॉ. व्यंकटेश काब्दे यांनी १९८९ च्या लोकसभा निवडणुकीत काँगेसच्या अशोक चव्हाण यांचा पराभव केला होता. डॉ. व्यंकटेश काब्दे त्यावेळी २४ हजार ११३ मताधिक्याने निवडून आले होते. १९८७ मध्ये नांदेड मतदारसंघातील पोटनिवडणुकीत अशोक चव्हाण यांनी प्रकाश आंबेडकर यांचा पराभव करून वयाच्या तिशीत लोकसभेत प्रवेश केला होता. मात्र, त्यानंतर दोनच वर्षांनी १९८९ च्या निवडणुकीत त्यांना पराभव पहावा लागला होता.