नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्षपद गांधीतर नेत्याच्या हाती देण्याबाबत पक्षांतर्गत सहमती होऊ लागली असून राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मंगळवारी गेहलोत यांच्याशी चर्चा केल्यानंतर नव्या पक्षाध्यक्षाच्या निवडीची प्रक्रिया गतिमान झाली आहे.

काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत निवडणुका पार पडल्या असून आता पक्षाध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. २१ सप्टेंबपर्यंत नवा पक्षाध्यक्ष निवडला जाणार आहे. या निवडणुकीसाठी २० ऑगस्टपासून प्रक्रिया सुरू झाली असली तरी, माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी अजूनही पक्षाध्यक्षपद स्वीकारण्याची तयारी दाखवलेली नाही. काँग्रेसचा नवा अध्यक्ष गांधीतर असला पाहिजे, या भूमिकेवर राहुल गांधी ठाम असल्याचे काँग्रेसमधील सूत्रांचे म्हणणे आहे. ‘‘राहुल गांधी यांना आम्ही समजावण्याचा खूप प्रयत्न केला. तुम्ही पक्षाध्यक्षपद स्वीकारले तर सोनियांना विश्रांती घेता येईल, असेही आम्ही राहुल यांना सांगितले होते. पण त्यांनी होकार दिलेला नाही,’’ असे काँग्रेसमधील नेत्यांनी सांगितले.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या काळात काँग्रेसने महागाईविरोधात आंदोलन केले होते. त्या वेळी राहुल गांधींसह काँग्रेसच्या अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन किंग्जवे येथील पोलीस सभागृहात ठेवले होते. तिथे अनेक काँग्रेस नेत्यांनी राहुल गांधी यांच्याशी अनौपचारिक चर्चा केली होती व पक्षाध्यक्षपद स्वीकारण्याचा आग्रह केला होता. मात्र तिथेही राहुल गांधी काँग्रेससाठी आपण काम करत राहू, पण गांधी कुटुंबातील सदस्य पक्षाध्यक्ष न होताही पक्षाला सक्षम करता येईल, अशी भूमिका राहुल गांधी घेतल्याचे समजते. त्यामुळे राहुल गांधी पक्षाध्यक्ष होण्याची शक्यता मावळू लागली असल्याचे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. मात्र त्यांची सातत्याने मनधरणी केली जात आहे.

पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीसंदर्भात २८ ऑगस्ट रोजी कार्यकारिणीची बैठक बोलावण्यात आली असून यामध्ये निवडणुका संपूर्ण कार्यक्रम निश्चित केला जाईल. ही बैठक दूरचित्रसंवादाद्वारे होणार असून तोपर्यंत राहुल गांधी होकार कळवला नाही तर, पक्षाला अधिकृतपणे गांधीतर नेत्याला पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरावे लागेल. राहुल गांधी पक्षाध्यक्ष होण्यास तयार होणार नाहीत, हे गृहीत धरून सोनियांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची भेट घेऊन चर्चा केल्याचे सांगितले जाते. सोनिया, प्रियंका व राहुल गांधी हे तिघे परदेशी गेले असून रविवारी होणाऱ्या बैठकीत ते उपस्थित राहण्याची शक्यता कमी असल्याचे समजते.

काँग्रेसच्या अध्यक्षपदी गांधी कुटुंबातील सदस्याची नियुक्ती न करण्याच्या भूमिकेवर राहुल गांधी ठाम असल्याने प्रियंका गांधी-वाड्रा यांचे नावही मागे पडले आहे. शिवाय भाजपकडून काँग्रेसवर सातत्याने घराणेशाहीचा आरोप खोडून काढण्यासाठीही गांधीतर नेत्याची नियुक्ती करावी, असे राहुल गांधी यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता अशोक गेहलोत यांचे नाव अध्यक्षपदासाठी आघाडीवर आहे. त्यांच्याशिवाय मल्लिकार्जुन खरगे, कुमार शैलजा, मुकुल वासनिक यांची नावे काँग्रेसने चर्चेत ठेवली असली तरी सोनिया आणि गेहलोत यांच्या भेटीनंतर रविवारी होणाऱ्या बैठकीत गेहलोत यांना पक्षाध्यपदाची उमेदवारी देण्यावर अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो.

पक्षांतर्गत बंडखोर आक्रमक होण्याची शक्यता

काँग्रेसच्या अध्यक्षपदी गांधी कुटुंबातील सदस्याची नियुक्ती होणार नसेल तर, पक्षांतर्गत बंडखोर आक्रमक होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. गुलामनबी आझाद व आनंद शर्मा यांनी अनुक्रमे जम्मू-काश्मीर प्रचार समिती व हिमाचल प्रदेश प्रचार समितीतून अंग काढून घेतले आहे. गांधी कुटुंबाचा उमेदवार म्हणून अशोक गेहलोत यांना मैदानात उतरवले गेले तर बंडखोर ‘जी-२३’ गटातील नेत्यांपैकी कोणीही गेहलोत यांना आव्हान देण्याचीही शक्यता आहे. या सर्व शक्याशक्यतांवर रविवारी होणाऱ्या कार्यकारणीच्या बैठकीत चर्चा होऊ शकेल, असे सांगितले जाते.

सचिन पायलट मुख्यमंत्री?

सोनियांनी चर्चा केली असली तरी, राजस्थानचे मुख्यमंत्रीपद सोडण्यास अशोक गेहलोत तयार नसल्याचे समजते. काँग्रेसच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागेल हे आपल्याला माहिती नाही, असे गेहलोत यांनी बुधवारी पत्रकारांना सांगितले. गेहलोत हे अत्यंत अनुभवी, मुरब्बी नेते असून पक्षाचे संघटना महासचिव म्हणूनही त्यांनी काम केलेले आहे. गेहलोत गांधी निष्ठावान असून सोनियांचा त्यांच्यावर अधिक विश्वास असल्याचे सांगितले जाते. राजस्थानच्या सत्तास्पर्धेत सचिन पायलट यांचे बंड गेहलोत यांनी मोडून काढले असले तरी, पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची जबाबदारी सचिन पायलट यांच्याकडे सोपवली जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते. कदाचित विधानसभा निवडणुकीआधी त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपदही दिले जाऊ शकते.

Story img Loader