Ashok Gehlot On Shankar Aiyar Sirfira : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर हे त्यांच्या विधानांमुळे कायमच चर्चेत असतात. नुकतंच एका मुलाखतीत बोलताना मणिशंकर अय्यर यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबाबत एक विधान केलं आणि त्यानंतर त्यांच्यावर काँग्रेसच्या नेत्यांनी टिकेची झोड उठवली आहे. ‘राजीव गांधी यांची जेव्हा पंतप्रधानपदी निवड झाली होती, तेव्हा आपल्यालाही आश्चर्य वाटलं होतं. कारण दोनदा अपयशी झालेला माणूस पंतप्रधान कसा होऊ शकतो?’, असं विधान मणिशंकर अय्यर यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानाला आता काँग्रेसच्या नेत्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यावर तीव्र शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “वेडा माणूसच अशा प्रकारची विधानं करू शकतो. अशा प्रकारची बेजबाबदार विधाने काँग्रेस पक्षाच्या विचारसरणीच्या विरोधात आहेत, अशी विधानामुळे पक्षाच्या प्रतिमेला हानी पोहोचते”, असं म्हणत अशोक गहलोत यांनी संताप व्यक्त केला आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

अशोक गहलोत काय म्हणाले?

“कोणत्या कॉलेजमध्ये कोण पास होतं किंवा नापास होतं, त्याचा मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान होण्याशी काहीही संबंध नाही. पाकिस्तान आणि राजीव गांधी यांच्याबद्दलची मणिशंकर अय्यर यांची विधाने निराशेची उंची गाठणारी आहेत. त्यामुळे मी त्यांना म्हटलं की, वेडा माणूसच असं बोलू शकतो. एवढी निराशा असेल तर माणूस काय बोलतो ते समजत नाही”, अशा शब्दांत अशोक गहलोत यांनी मणिशंकर अय्यर यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

मणिशंकर अय्यर यांनी काय म्हटलं होतं?

“जेव्हा राजीव गांधी पंतप्रधान झाले होते, तेव्हा मला वाटलं की एअरलाइन पायलट असलेली एक व्यक्ती आणि दोनदा अपयशी ठरलेली व्यक्ती पंतप्रधान कशी होऊ शकते? मी त्याच्याबरोबर केंब्रिज विद्यापीठात शिकलो. केंब्रिज विद्यापीठात नापास होणं कठीण आहे. कारण त्या विद्यापीठात किमान प्रत्येकजण उत्तीर्ण व्हावा, यासाठी प्रयत्न केले जातात. मात्र, तरीही राजीव गांधी हे अपयशी ठरले. यानंतर ते लंडनमधील इम्पीरियल कॉलेजमध्ये गेले. आता त्या ठिकाणी देखील ते अपयशी झाले. तेव्हा मला असं वाटलं की, दोनदा अपयशी झालेला माणूस देशाचा पंतप्रधान कसा होऊ शकतो?”, असं विधान मणिशंकर अय्यर यांनी केलं होतं.

दरम्यान, मणिशंकर अय्यर यांच्या या विधानाचा व्हिडीओ भारतीय जनता पक्षाचे नेते अमित मालवीय यांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर करत काँग्रेसवर टीका केली होती. तसेच मणिशंकर अय्यर यांच्या या विधानावरून काँग्रेस नेते हरीश रावत यांनीही यावर प्रतिक्रिया देत ‘मी निराश व्यक्तीवर भाष्य करू इच्छित नाही. राजीव गांधींनी देशाला आधुनिक दृष्टीकोन दिला. त्यांनी अर्थव्यवस्थेच्या उदारीकरणासाठीही ठोस पावले उचलली. पण हे दुर्दैव आहे की पक्षाचा एक भाग (काँग्रेस) त्यांच्या पाठीशी उभा राहिला नाही”, अशी टीका हरीश रावत यांनी मणिशंकर अय्यर यांच्या विधानावर केली होती.

Story img Loader