पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच महिन्यांपूर्वी मध्य प्रदेशमधील भोपाळमध्ये भाजपाच्या बूथ कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. या कार्यक्रमात मोदी यांनी देशभरातील विरोधी पक्षांवर टीका केली होती. अनेक पक्षांवर घराणेशाहीचे आरोप केले. तसेच ज्या पक्षांमधील नेत्यांच्या सक्तवसुली संचालनालय, आयकर विभाग किंवा सीबीआयकडून चौकशा सुरू आहेत, अशा पक्षांवर, त्या पक्षांमधील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. यावेळी केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरही जोरदार हल्लाबोल केला होता. मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर घराणेशाहीचा आणि भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. परंतु, त्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार हे पक्षातील अनेक नेत्यांसह आता भाजपाबरोबर सत्तेत बसले आहेत. तसेच अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे राष्ट्रवादीचे नेते पंतप्रधान मोदींबरोबरच्या बैठकांना हजेरी लावत आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भोपाळच्या सभेत पंतप्रधान मोदी म्हणाले होते, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर तब्बल ७०,००० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे. असा एकही विभाग नाही जिथे काँग्रेसने घोटाळा केला नसेल. शरद पवारांच्या राष्ट्रवादीवरही भ्रष्टाचाराचे अनेक आरोप आहेत. आता भाजपा कार्यकर्त्यांनी थोडे प्रयत्न करायला हवेत आणि या काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाल्यांच्या घोटाळ्यांचा मीटर वाढवायला हवा (त्यांचे इतर घोटाळे बाहेर काढायला हवेत).

पंतप्रधानांनी केलेल्या या आरोपांनंतर अवघ्या काही दिवसांनी अजित पवार यांनी राष्ट्रवादीमधल्या अनेक आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांना घेऊन वेगळा गट बनवला. या गटासह त्यांनी भाजपाबरोबर युती केली, तसेच ते महाराष्ट्रात भाजपाबरोबर सत्तेत सहभागी झाले. अजित पवार हे आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून कारभार पाहत आहेत. तर राष्ट्रवादीच्या इतर आठ आमदारांना मंत्रीपदं मिळाली आहेत. अजित पवार आणि त्यांच्याबरोबर गेलेल्या आमदारांनी ईडीची चौकशी, सीबीआयची चौकशी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळेच पक्षात बंडखोरी करून भाजपाबरोबर हातमिळवणी केल्याचा आरोप होत आहे. तसेच पंतप्रधान मोदी यांनी या नेत्यांना भाजपाच्या वॉशिंग मशीनमध्ये धुवून स्वच्छ केलं आहे, असा टोला, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी लगावला आहे.

अशोक गहलोत म्हणाले, मी तुम्हाला पंतप्रधान मोदी यांचं एक उत्तम उदाहरण देतो. खरंतर ते चांगलं भाषण करतात, ते बोलतात तेव्हा देश त्यांचं ऐकतो. अलिकडेच ते भोपाळमध्ये एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल, अजित पवारांबद्दल बोलले होते. त्यांच्यावर भ्रष्टाचारचे आरोप केले होते. त्यानंतर दोन दिवसांनी, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडते आणि अजित पवार नावाचे नेते आमदारांच्या मोठ्या गटासह भाजपाप्रणित महाराष्ट्र सरकारमध्ये सहभागी होतात. ज्या अजित पवारांवर मोदींनी भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्याच अजित पवारांना मोदींनी राज्याचं अर्थमंत्रीपद दिलं आहे.

हे ही वाचा >> सुनेत्रा पवारांच्या वाढदिवसाच्या होर्डिंगबाबत सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य; म्हणाल्या, “माझ्याविरोधात कोणीतरी…”

अशोक गहलोत म्हणाले, पंतप्रधान मोदी आधी आरोप करतात, मग संबंधित लोक भाजपात जातात, त्यांना तिथे भाजपाच्या वॉशिंग मशीनने धुतंल जातं. त्यानंतर मंत्रीपदं दिली जातात. हे देशात सगळीकडेच होत आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashok gehlot says narendra modi made corruption accusations ajit pawat join in bjp washing machine asc
Show comments