महेश सरलष्कर
नवी दिल्ली : ‘मी कधीपासून मुख्यमंत्रीपद सोडायला तयार आहे; पण हे पद मला सोडत नाही. ते मला कधी सोडेल असे वाटत नाही,’ अशी मिश्कील टिप्पणी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी गुरुवारी दिल्लीतील पत्रकार परिषदेत केली; पण या टिप्पणीमधून गेहलोत यांनी मुख्यमंत्रीपदावर आपलाच हक्क असल्याचे स्पष्ट केले. सचिन पायलट तसेच, केंद्रीय नेतृत्वाला दिलेला हा अप्रत्यक्ष इशारा असल्याचे मानले जात आहे.
या वेळी गेहलोत म्हणाले की, सोनिया गांधी, राहुल गांधी व प्रियंका गांधी यांचा माझ्यावर विश्वास आहे म्हणूनच त्यांनी मला या पदावर कायम ठेवले आहे. मोदींविरोधात थेट लढणारे राहुल गांधी हे एकमेव नेते आहेत, त्यांचे हात मजबूत केले पाहिजेत असे ते म्हणाले.
मतभेद मिटल्याचा दावा
काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने अशोक गेहलोत व सचिन पायलट यांच्यातील वाद मिटवल्याचे सांगितले जाते. तरीही, गेहलोत सातत्याने पायलटांच्या बंडाचा उल्लेख करत होते. मात्र, पायलट यांच्याशी मतभेद नाहीत, असे गेहलोत म्हणाले.
हेही वाचा >>>इस्रायल-हमास युद्धावरून जो बायडेन यांना अमेरिकन खासदाराने सुनावलं, म्हणाल्या, “जागे व्हा आणि…”
जनता माफ करणार नाही
विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू असतानाही सीबीआय, ईडी नेत्यांच्या मालमत्तांवर छापे टाकत आहेत. खरे तर आचारसंहितेमध्ये हे छापे थांबले पाहिजेत. तपास यंत्रणाच्या चौकशीचा ससेमिरा चालूच राहिला तर लोक माफ करणार नाहीत, असा इशारा गेहलोत यांनी दिला.
माझ्यामुळे वसुंधरा राजेंवर अन्याय नको!
भाजपच्या नेत्या व माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजेंवर त्यांच्या पक्षामध्ये अन्याय होत असल्याच्या मुद्दय़ावर गेहलोत यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला टोला हाणला. ‘माझ्यामुळे वसुंधरा राजेंना शिक्षा कशासाठी देता? त्यांच्यावर अन्याय करू नका,’ असे गेहलोत म्हणाले.