भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू जितके लोकप्रिय होते, तितकेच गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदीही लोकप्रिय असल्याचे मत विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल यांनी बुधवारी व्यक्त केले. 
कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी सिंघल येथे आले आहेत. नेहरूंनंतर संपूर्ण देशभरात त्यांच्या इतकीच लोकप्रियता मिळवणारा नेता पहिल्यांदाच दिसतो आहे, या शब्दांत सिंघल यांनी मोदी यांचा गौरव केला. पंतप्रधानपदासाठी मोदी यांना उमेदवारी द्यावी, यासाठी हिंदूत्त्ववादी संघटनांनी भारतीय जनता पक्षावर दबाव टाकला आहे. त्याचवेळी सिंघल यांनी मोदी यांच्या कामाचा जाहीरपणे गौरव केला. मोदी यांच्या उमेदवारीसाठी विश्व हिंदू परिषद प्रयत्न करणार का, असा प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, देशातील हिंदूंना त्यांच्या योग्यतेचे काम मिळवून देण्यासाठी विश्व हिंदू परिषद बांधील आहे.
भाजपचे अध्यक्ष राजनाथसिंह हे बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांना भेटणार आहेत आणि त्यानंतर ते विश्व हिंदू परिषदेच्या मध्यवर्ती कार्यकारिणीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. त्याचवेळी सिंघल यांनी मोदी यांचे कौतुक केले, हा केवळ योगायोग नक्कीच नाही.
आम्हाला राजकारणात येण्याची अजिबात इच्छा नाही. आम्ही केवळ हिंदू समुदायाच्या कल्याणाचा विचार करतो, असेही सिंघल यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा