Ashwini Vaishnav : केंद्र सरकारमध्ये सहसचिव, संचालक आणि उपसचिव या पदांवर लवकरच परीक्षा न घेता विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची भरती करण्याचा निर्णय मोदी सरकारने जाहीर केली आहे. यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाने ४५ जागांसाठी जाहिरातही प्रसिद्ध केली आहे. या निर्णयानंतर विविध राजकीय प्रतिक्रियादेखील उमटू लागल्या आहेत. यावरून काल लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली होती. हा निर्णय म्हणजे अनुसूचित जाती-जमाती आणि ओबीसींचे हक्क हिरावण्याचा प्रयत्न आहे, असं ते म्हणाले होते. दरम्यान, या टीकेला आता केंद्र सरकारमधील मंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

अश्विनी वैष्णव नेमकं काय म्हणाले?

अश्विनी वैष्णव यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. “काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ज्याप्रकारे टीका केली आहे, त्यावरून काँग्रेस पक्षाचा दुटप्पीपणा दिसून येतो, कारण तज्ज्ञांना थेट सेवेत घेण्याची संकल्पना काँग्रेसनेच मांडली होती”, असे म्हणाले.

हेही वाचा – Rahul Gandhi Citizenship Controversy: आता राहुल गांधींच्या नागरिकत्वावरून वाद? भारताचं नागरिकत्व रद्द करण्याची मागणी करणारी याचिका दाखल!

“२००५ मध्ये यूपीए सरकारने दुसरा प्रशासकीय सुधारणा आयोग स्थापन केला होता. या आयोगाचे नेतृत्व काँग्रेस नेते विरप्पा मोईली यांनी केले होते. या आयोगाने विविध क्षेत्रातील तज्ज्ञांना थेट प्रशासकीय सेवेत सहभागी करून घेण्याची शिफारस केली होती. मोदी सरकारने केवळ या पारदर्शकपणे शिफारसीची अंमलबजावणी केली. या निर्णयामुळे सरकारची कार्यक्षमता वाढेल”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

राहुल गांधी नेमकं काय म्हणाले होते?

यूपीएससीची परीक्षा न घेता विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची भरती करण्याचा निर्णय मोदी सरकारने जाहीर केला होता. यावरूनच राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारला लक्ष्य केलं होतं. “केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयातील उच्च पदावर बाहेरून उमेदवार निवडून मोदी सरकार एकप्रकारे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसींचा हक्क हिसकावून घेत आहे. त्यांच्या आरक्षणाला यामुळे नख लागत आहे. मी हे वारंवार सांगत आलो आहे की, सरकारमधील महत्त्वाच्या पदांवर उपेक्षित घटकांतील अधिकारी नियुक्त केलेले नाहीत. यात सुधार करायचा सोडून केंद्र सरकार आता खुलेआम बाहेरून उमेदवार आयात करून उच्च पदांवर त्यांना बसविणार आहे, असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं.

हेही वाचा – उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींना वाकून केला नमस्कार? फोटोमुळे राजकीय चर्चांना उधाण; पण ‘या’ लहानशा गोष्टीमुळे सिद्ध झालं खरं

“जे युवक-युवती यूपीएससीसाठी मेहनत करतात त्यांच्याही अधिकारावर यामुळे गदा येणार आहे. तसेच मेहनती आणि प्रामाणिक उमेदवारांना डावलले जाणार आहे. यामुळे आरक्षणासारख्या सामाजिक न्यायाच्या संकल्पनेला तडा जात आहे”, असा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. तसेच “या राष्ट्रविरोधी धोरणाचा इंडिया आघाडीकडून कडाडून विरोध केला जाईल. भारताची प्रशासकीय यंत्रणा आणि सामाजिक न्यायाच्या तत्त्वाला या निर्णयामुळे मोठा धक्का बसेल. तसेच आयएएस सारख्या पदाचे खासगीकरून करून आरक्षण संपविण्याची ही मोदी गँरटी आहे”, अशी जळजळीत टीकाही त्यांनी केली होती.