Ashwini Vaishnaw Gets Angry in Lok Sabha : गेल्या काही वर्षांमध्ये रेल्वे अपघातांची संख्या वाढली आहे. तसेच रेल्वे संबंधित घटनांमधील मृत्यूंचं प्रमाण देखील वाढलं आहे. त्यामुळे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव हे सातत्याने विरोधकांच्या टीकेचे धनी बनत असतात. तसेच रेल्वे विभाग जुन्या रेल्वेचा मेंटेनन्स, दगडुजी करण्याऐवजी, उत्तम सेवा देण्याऐवजी केवळ ‘वंदे भारत’ या महागड्या रेल्वेसेवेवर लक्ष केंद्रित करत असल्याचा आरोप सरकारवर होत आहे. दरम्यान, विरोधक रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यावर सातत्याने ‘रील मंत्री’ अशी टीका करत आहेत. अश्विनी वैष्णव हे रेल्वे संबंधित वेगवेगळी माहिती इन्स्टाग्राम रील्सच्या माध्यमातून शेअर करत असतात. त्यावरून ते टीकेचे धनी बनत आहेत. हीच टीका आज (१ ऑगस्ट) लोकसभेतही पाहायला मिळाली.
लोकसभेत आज वेगवेगळ्या खासदारांनी अर्थसंकल्पातील रेल्वेसाठी केलेली तरतूद, रेल्वेची सध्याची परिस्थिती आणि अपघातांवरून रेल्वे मंडळावरील नाराजी व्यक्त केली. या सर्व प्रश्नांना व टीकेला रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी उत्तर दिलं. मात्र वैष्णव भाषण करत असताना विरोधी बाकावर बसलेले काही खासदार धिम्या आवाजात रील मंत्री असं म्हणाले. त्यानंतर अश्विनी वैष्णव यांचा पारा चढला आणि ते विरोधी खासदारांवर आरडाओरड करू लागले.
सभागृहात नेमकं काय घडलं?
अश्विनी वैष्णव म्हणाले, “रेल्वेमध्ये काही जागा रिकाम्या आहेत. आगामी काळात आम्ही ४० ते ४५ हजार तरुणांची भरती करणार आहोत. त्यामुळे देशभरातील तरुणांना रेल्वेत नोकरी करण्याची संधी मिळेल.” त्यापाठोपाठ वैष्णव यांनी गेल्या काही वर्षांमध्ये रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी केलेला खर्च सर्वांसमोर मांडला.
अश्विनी वैष्णव म्हणाले, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आपण आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये ८७ हजार ३३६ कोटी रुपये खर्च केले. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये ९८ हजार ४१४ कोटी रुपये खर्च केले. यंदाच्या अर्थसंकल्पात १ लाख ८ हजार ७९५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नागरिकांना सुरक्षित रेल्वे प्रवास करता यावा व सुरक्षिततेसाठी रेल्वेचा मेन्टेनन्स सर्वात महत्त्वाचा असतो. रेल्वेचा मेन्टेनन्स चांगला असावा यासाठी आपण नवी कार्यप्रणाली बनवली आहे. एक नवीन रोलिंग ब्लॉक सिस्टिम सादर केली आहे. याद्वारे आपण पुढील २६ आठवड्यांचं प्लानिंग केलं आहे. आपण ही सिस्टिम पूर्णपणे सुरू करू शकलो तर पुढील अनेक दशकं आपल्याला त्याचा लाभ मिळेल.
हे ही वाचा >> Vishal Patil : “तुम्ही विरोधक नव्हे….”, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांची विशाल पाटलांना साद? संसदेत काय घडलं?
अन् रेल्वेमंत्र्यांचा पारा चढला
दरम्यान, अश्विनी वैष्णव लोको पायलटबाबतच्या प्रश्नावर उत्तर देत असताना विरोधी बाकावरून कोणीतरी ‘रील मंत्री’ असे शब्द उच्चारले. त्यावर अश्विनी वैष्णव म्हणाले, आम्ही केवळ रील बनवणारे लोक नाही. आम्ही मेहनत करणारे लोक आहोत. काम करणारे लोक आहोत. तुम्हाला कळत नाही का? बसा…बसा… खूप झालं तुमचं… अध्यक्ष महोदय हे लोक काहीही बोलतात… ही कसली पद्धत झाली… ही बोलण्याची पद्धत आहे का?