एका साधुच्या दृष्टांतानुसार उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यातील दौंडिया खेडय़ातील किल्ल्यात एक हजार टन सोने गाडलेले असल्याचे समजल्यानंतर भारतीय पुरातत्त्व विभागाकडून कडेकोट बंदोबस्तात येथे उत्खननाला सुरुवात करण्यात आली आह़े  मात्र एका साधुच्या स्वप्नावर विश्वास ठेवून चालविलेला हा बालिशपणा तर नव्हे ना, अशी शंका उपस्थित केली जात आह़े
पुरातत्त्व विभागाचे उपसंचालक पी़ क़े मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली १२ सदस्याचा एक गट उत्खननाचे काम करीत आह़े  ५-६ इंच खोदकाम झाले असून दिवसअखेरीस हे खोदकाम पुरात्तत्व विभागाने बंद केले आहे. भारतीय भौगोलिक सर्वेक्षण विभागाने रविवारी या भागाचे सर्वेक्षण केले असून त्यांना तेथे २० मीटर खोलीवर जड धातू असल्याचे समजले आहे. जिल्हा दंडाधिकारी विजय किरण आनंद यांनी सांगितले की, केवळ साधुच्या सांगण्यानुसार नव्हे तर भौगोलिक विभागानेही येथे सोने किंवा चांदी असल्याची शक्यता वर्तविली आह़े  त्यामुळे तो धातू नेमका कुठला आहे, याची शहानिशा करण्यासाठी आम्ही हे उत्खनन करीत आहोत. हे उत्खनन पूर्ण होण्यासाठी किमान महिन्याभराचा कालावधी लागणार आह़े
दरम्यान, उत्सुकतेपोटी आलेल्या लोकांमुळे या भागातील दुकानदारांची मात्र चांदी झाली आहे. अधिकाऱ्यांनी या मंदिराच्या ठिकाणी अडथळे लावले असून खजिना सापडण्याच्या आशेने बरेच लोक तिथे आले आहेत, प्रार्थना करीत आहेत. दोन वर्षांपूर्वी केरळातील एका १६ व्या शतकातील मंदिरात उत्खनन करताना खजिना सापडला होता, पण त्या वेळी प्रसारमाध्यमांना तिथे येऊ दिले नव्हते. श्री पद्मनाभस्वामी मंदिराच्या परिसरात हंडाभर नाणी, रत्नजडित टोप, सोन्याच्या मूर्ती सापडल्या होत्या.
दरम्यान, उत्खननाच्या कामावर देखरेख ठेवण्यात यावी, या मागणीसाठीची याचिका सर्वोच्च न्यायालयानेशुक्रवारी दाखल करून घेतली. सरन्यायाधीश पी. सथशिवम यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने या याचिकेची तातडीने सुनावणी करण्याचे नाकारले आह़े  हे प्रकरण मांडणाऱ्या याचिकेत अनेक चुका असून, त्या पुढील आठवडय़ाच्या सुनावणीच्या वेळी दुरुस्त कराव्यात, असे सांगितले आहे. ‘खरेच तेथे सोने सापडल्यास ते नष्ट होणे, चोरीस जाणे या शक्यता गृहीत धरता अशा उत्खननात देखरेख आवश्यक आहे. त्यामुळे राज्य सरकारने या प्रक्रियेची दखल घ्यावी’, असे मत याचिकाकर्ते वकील एम. एल. शर्मा यांनी म्हटले आहे.

मोदींची टीका
स्वीस बँकेतील काळा पैसा भारतात आणण्यासाठी प्रयत्न केले, तर तो खोदकाम करून मिळणाऱ्या हजार किलो सोन्यापेक्षा अधिक असेल, अशी उपहासात्मक टीका भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आह़े  चेन्नई येथे कार्यकर्त्यांच्या मेळव्यात ते बोलत होत़े

बाजारात तुरी..
अजून असल्याचे सिद्धही झालेले नसताना राजा राव बक्ष सिंग यांचे एक वारसदार नवचंडी वीर प्रताप सिंग यांनी सांगितले की, जर खरेच सोने सापडले तर त्यात आमचा वाटा आहे. मात्र, उत्तर प्रदेश सरकारच्या अधिकाऱ्यांनी व स्थानिक अधिकाऱ्यांनी त्यावर आमचा अधिकार आहे, असा दावा त्यांना केला आहे. स्थानिक लोकांच्या मते उन्नाव जिल्ह्य़ात यापूर्वीही सोन्या चांदीची नाणी सापडली आहेत.

पुजाऱ्याचे स्वप्न!
दौंडिया खेरा खेडय़ातील २५०० टन सोने राजा राव रामबक्ष सिंग यांनी किल्ल्यात गाडून ठेवले असल्याचे शोभन सरकार या पुजाऱ्याच्या स्वप्नात आल्याचे कळल्यानंतर भारतीय पुरातत्त्व संस्थेने उत्खनन सुरू केले. सरकार यांचा असा दावा आहे, की उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी असे सोन्याचे खजिने आहेत. त्यांनी या दाव्याबाबत पंतप्रधानांना पत्रही पाठवले असून सोने न सापडल्यास तुरुंगात जाण्याची तयारी दर्शवली आहे. राजा राव रामबक्ष सिंग हे १८५७च्या उठावात हुतात्मा झाले होते. सरकार यांचे स्वप्न फार गांभीर्याने घेण्याचे कारण नाही असे स्थानिक प्रशासनाने म्हटले होते, पण केंद्रीय मंत्र्यांनी या भागाला भेट देऊन तेथील पुजारी सरकार यांची भेट घेतली. नंतर मंत्र्यांनी पुरातत्त्व खात्याला लगेच उत्खनन करण्याचे आदेश दिले.