पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने आसिया या ख्रिश्चन महिलेला ईश्वरनिंदेप्रकरणी सुनावण्यात आलेली मृत्यूदंडाची शिक्षा रद्द करत ऐतिहासिक निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अनेकांनी रस्त्यावर उतरुन निर्णयाविरोधात निदर्शन करण्यास सुरुवात केली आहे. चार मुलांची आई असणाऱ्या आसिया यांना 2010 मध्ये ईश्वरनिंदेप्रकरणी मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. तेव्हापासूनच त्या तुरुंगात मृत्यूच्या छायेत आपलं आयुष्य व्यतित करत होत्या. आसियाचे वकील तिची शिक्षा माफ करण्यासाठी आणि तिच्या जामीनासाठी प्रयत्न करत होते. 2016 मध्ये त्यांनी सुप्रीम कोर्टात तिच्या शिक्षेवर फेरविचार याचिका दाखल केली होती. अखेर सर्वोच्च न्यायालयाने ही शिक्षा रद्द केली आहे.
पाकिस्तानात इस्लामचा अपमान करणं दंडनीय आहे. ईश्वरनिंदेप्रकरणी 1987 ते 2016 दरम्यान एकूण 1472 लोकांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. आसिया यांना शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर देसभरातील ख्रिश्चन धर्मियांनी संताप व्यक्त केला होता.
पाकिस्तानचे मुख्य न्यायाधीश साकीब निसार यांनी शिक्षा रद्द करताना सांगितलं की, ‘याचिका मान्य करण्यात आली असून आसिया यांची सुटका करण्यात येत आहे. हायकोर्ट आणि ट्रायल कोर्टाचा निर्णय रद्द ठरवत आहोत. शिक्षा रद्द करण्यात येत आहे’.
आसिया यांची तात्काळ सुटका करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आला आहे. मात्र त्यांच्या सुरक्षेसाठी कोणती व्यवस्था करण्यात आली आहे की नाही यासंबंधी त्यांनी काही सांगितलं नाही. न्यायालयाच्या निर्णयाचं आसिया यांच्या लीगल टीमने स्वागत करत सेलिब्रेशन केलं. आसिया यांचे वकील सैफ-उल-मुलूक यांनी सांगितल्यानुसार, ‘या निर्णयामुळे देशातील गरिब, अल्पसंख्यांक आणि समाजातील सर्वांना न्याय मिळेल हे सिद्ध केलं आहे’.
काय आहे घटना –
ही घटना पाकिस्तानात 2009 च्या उन्हाळ्यात घडली. आसिया यांनी एका विहीरीतलं पाणी बादलीने पाणी बाहेर काढून तेथेच ठेवलेला ग्लास उचलला आणि त्यात पाणी प्यायले होते. आसपास असणाऱ्या महिलांनाही त्यांनी ग्लासभर पाणी दिले. त्याचवेळी दुसऱ्या एका महिलेने त्यांना अडवले. महिलेने पाणी पिण्यापासून रोखले कारण ते पाणी हराम होते. ख्रिस्ती महिलेने त्या पाण्याला स्पर्श करून अशुद्ध केले. त्यावर येशू ख्रिस्त आणि मोहम्मद पैगंबर यांनी या कार्यास एकाच नजरेतून पाहिले असते असे उत्तर आसियाने दिले. आसियाचे उत्तर ऐकूण महिलांनी गोंधळ घातला. मोहम्मद पैगंबर यांची तुलना येशू ख्रिस्तांशी केलीच कशी असा जाब त्यांनी तिला विचारला. यातून इस्लामचा स्वीकार करूनच तू वाचू शकतेस असे तेथील महिलांनी सांगितले. पण, आसियाने तसे करण्यास स्पष्ट नकार दिला. मला आपल्या धर्मावर आस्था आहे आणि धर्म परिवर्तन करणार नाही असे तिने सर्वांना सांगितले. यानंतर तिने इस्लाम आणि ख्रिस्ती धर्माची तुलना करताना येशू ख्रिस्तांचे कौतुक केले. त्याच गोष्टीचा लोकांना प्रचंड राग आला.