देशामध्ये सुरु असणाऱ्या लॉकडाउनचा मोठा आर्थिक फटका अनेक कंपन्यांना बसला आहे. त्यामुळे अगदी कामगारकपातीपासून ते पगारकपातीपर्यंतचे वेगवेगळ्या पर्यायांच्या माध्यमातून पैसे बचत करण्याकडे कंपन्यांचा कल असतानाच एशियन पेंट्सने मात्र कर्मचाऱ्यांना घसघशीत पगारवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील सर्वात मोठी रंग निर्मिती कंपनी असणाऱ्या एशियन पेंट्सने या कठीण प्रसंगामध्ये कामगारांचा उत्साह वाढवण्यासाठी पगारवाढ देण्याचा निर्णय घेतल्याचे ‘इकनॉमिक टाइम्स’ने आपल्या वृत्तात म्हटलं आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर एशियन पेंट्सने आपल्या सेल्स विभागातील कर्मचाऱ्यांसाठी रुग्णालयाचा खर्च, विमा कवच अशा सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर रंगांची विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये म्हणजेच पार्टनर स्टोअर्समध्ये स्वच्छेतेचे पालन कडेकोटपणे केले जाईल यासंदर्भातही काळजी घेण्यासाठी कंपनीने विशेष व्यवस्था केली आहे. यासाठी कंपनीने कॉन्टॅक्टर्सच्या खात्यांवर ४० कोटी रुपये जमा केल्याची ‘इकनॉमिक टाइम्स’चे म्हणणे आहे.
“कंपनीमध्ये सहभाग असणाऱ्या प्रत्येकाची काळजी घेणारे नेतृत्व कसं असावं याचं उदाहरण दाखवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मी कंपनीच्या अधिकाऱ्यांशी या सर्व निर्णयांबद्दल संपर्कात असून त्यांच्याकडून यासाठी सकारात्कम प्रतिसाद मिळाला आहे,” अशी माहिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि प्रमुख कार्यकारी अधिकारी असणाऱ्या अमित सिंघल यांनी दिली. पुढे बोलताना सिंघल म्हणतात, “ही एक संधी असल्याचे मला वाटते. एकीकडे बाजारपेठेमध्ये संभ्रमाचे वातावरण असताना कंपनीने पुढे येऊन त्यांच्या कर्मचाऱ्यांना वाटत असणाऱ्या चिंतांबद्दल विचार करणे गरजेचे आहे. आम्ही केवळ कामावर घ्या आणि कामावरुन काढू टाका या उद्योगात नाही. आम्ही एक प्रगल्भ ब्रॅण्ड आहोत. या अशा कठीण प्रसंगी आम्ही सर्व कर्मचाऱ्यांना विश्वास देऊ इच्छितो की आपण सर्व या संकटात एकत्र आहोत.”
एशियन पेंट्सने करोनाविरुद्धच्या लढ्यासाठी केंद्र सरकारच्या पीएम केअर्ससाठी आणि मुख्यमंत्री मदतनिधीसाठी ३५ कोटी रुपये दिले आहेत. तसेच कंपनीने करोनाविरुद्धच्या संकटात देशातील सॅनिटायझर्सची मागणी लक्षात घेता सॅनिटायझर्स बनवण्यास सुरुवात केली आहे.
एकीकडे पगारवाढ देण्याचा निर्णय घेतला असला तरी दुसरीकडे एशियन पेंट्सने जिथे शक्य आहे तिथे खर्च कमी करण्यासाठी किंवा तो पुढे ढकलण्यासाठी प्रयत्न करत आहे. “आम्ही गेली अनेक वर्षे कर्जमुक्त आहोत आणि पुढील चार किंवा पाच महिने जरी अनिश्चितता कायम राहिली तरीही आम्ही यामधून सावरु. कंपनीने मार्चमध्ये मोठ्या प्रमाणात लाभांश देय देण्याची घोषणा केली होती आणि भागधारक परतावा करणे ही आमची सध्या सर्वोच्च प्राथमिकता असेल,” असे सिंगल यांनी सांगितले.