Dr. Manmohan Singh Death : माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांचे काल वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे काल (२६ डिसेंबर) त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे अवघ्या देशावर शोककळा पसरली आहे. मनमोहन सिंग यांना काल रात्री ८ वाजता दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना रात्री ९.५१ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांचे सुरक्षा रक्षक म्हणून काम केलेले आणि सध्या केंद्रीय राज्यमंत्री असलेल्या असीम अरुण यांनी त्यांच्याबद्दल एक भावूक आठवण एक्सवर पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी मनमोहन सिंग यांचा मारुती ८०० कारबद्दलचा किस्सा सांगितला आहे.

असीम अरुण यांची भावूक पोस्ट

सध्या मोदी सरकारमध्ये राज्यमंत्री असलेले असीम अरुण यांनी एक्सवर माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची आणि त्यांची कार मारुती ८०० बाबतची एक भावूक आठवण शेअर केली आहे.

आपल्या पोस्टमध्ये असीम अरुण यांनी सुरुवातीला लिहिले आहे की, “डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना २००४ पासून जवळजवळ तीन वर्षे मी त्यांचा अंगरक्षक होतो. एसपीजी मध्ये क्लोज प्रोटेक्शन टीम पंतप्रधानांच्या सुरक्षेचे सर्वात आतले वर्तुळ असते. ज्याचे नेतृत्व करण्याची मला संधी मिळाली होती. एआयजी सीपीटी ही अशी व्यक्ती असते जी कधीही पंतप्रधानांपासून दूर राहू शकत नाही. जर एकच अंगरक्षक असेल तर हा व्यक्तीही त्याच्यासोबत असतो. अशा परिस्थितीत त्यांच्यासोबत सावलीसारखे राहणे ही माझी जबाबदारी होती.”

हे ही वाचा : Dr. Manmohan Singh Death: मनमोहन सिंग म्हणाले होते, “…तो माझ्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा काळ”!

डॉक्टर साहेब पाहतच रहायचे…

या पोस्टमध्ये असीम अरुण यांनी पुढे लिहिले की, “डॉक्टर साहेबांकडे फक्त एकच कार होती, ती म्हणजे मारुती ८००, जी पंतप्रधानांच्या निवसस्थानात चमकणाऱ्या काळ्या BMW च्या मागे उभी असायची. मनमोहन सिंग जी मला वारंवार म्हणायचे, असीम, मला या गाडीतून प्रवास करायला आवडत नाही, माझी कार ही (मारुती) आहे. मी समजावून सांगायचो की सर, ही कार तुमच्या लक्झरीसाठी नाही, तिची सुरक्षा वैशिष्ट्ये खास आहेत त्यामुळे एसपीजीने ती घेतली आहे. पण जेव्हा जेव्हा मारुतीच्या समोरून गाडीचा ताफा जायचा तेव्हा ते त्याकडे अगदी मनापासून पाहत रहायचे.”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asim arun shared emotional memory about former prime minister dr manmohan singh and his car maruti 800 aam