तेलंगणाचे मंत्री केटी रामा राव यांनी गुरुवारी संध्याकाळी #AskKTRच्या माध्यमातून ट्विटरवरुन राज्याच्या नागरिकांच्या शंकांचं निरसन केलं. त्याचबरोबर राज्यातल्या १० दिवसांच्या लॉकडाउनच्या निर्बंधांसंदर्भातली जनतेची मतं जाणून घेतली.

रामाराव हे नगरपालिका प्रशासन, नगरविकास, उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री आहेत. तसंच राज्यातल्या नव्याने स्थापन करण्यात आलेल्या राज्य टास्क फोर्सचे प्रमुख आहेत. करोनासंदर्भातली औषधं आणि लसींचा योग्य पुरवठा करण्याच्या उद्देशाने या टास्क फोर्सची निर्मिती कऱण्यात आली आहे.

हा हॅशटॅग वापरुन अनेकांनी आपल्या शंका विचारल्या आहेत. त्यांना रामाराव यांनी त्वरित उत्तरंही दिली. एका युजरने विचारलं की, आपण राज्यातल्या चाचण्या कमी करुन त्यामुळे कमी होणाऱ्या आकड्यांकडे पाहत आत्मसंतुष्ट तर होत नाही ना? या युजरला दिलेल्या उत्तरात रामाराव म्हणतात, असं बिलकुल नाही. मी माहितीच्या आधारे सांगत आहे. त्याचबरोबर गृहविलगीकरणात असलेल्या आणि उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या आकडेवारीच्या आधारे बोलत आहे.

एका नागरिकाने त्यांना विचारलं की गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात फक्त ७० हजार चाचण्या झाल्या, पूर्वी १ लाखाच्या आसपास चाचण्या होत होत्या. त्याचबरोबर राज्य दररोज दीड लाख चाचण्या करुन निष्कर्ष काढण्याआधीच सरकार रुग्णसंख्येचा दावा कसा करु शकते असा सवालही त्याने उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, आयसीएमआरने लागू केलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार एखाद्याला लक्षणं दिसू लागल्यावर त्याच्या चाचणीचा निष्कर्ष काहीही येवो, त्याला सरकारद्वारा व्हिटॅमिन आणि प्राथमिक औषधं दिली जाऊ शकतात.

या प्रश्नोत्तरांसाठी रामाराव यांनी दोन तासाचा वेळ दिला होता. राज्यातल्या करोना परिस्थितीविषयीची माहिती त्यांनी यावेळी दिली. त्याचबरोबर ही परिस्थिती हाताळण्यासाठीच्या राज्याच्या नियोजनाबद्दलच्या शंकांना तात्काळ उत्तरेही दिली.

Story img Loader