She-Wolf of the stock market : सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने अस्मिता जितेंद्र पटेल यांच्यावर मोठी कारवाई करत त्यांच्याकडील ५४ कोटी रुपये जप्त केले आहे. याचबरोबर त्यांच्यावर बंदीही घातली आहे. ऑप्शन क्वीन आणि शी वुल्फ ऑफ स्टॉक मार्केट म्हणवणाऱ्या युट्यूबर अस्मिता जितेंद्र पटेल यांनी शेअर बाजार आणि ऑप्शन ट्रेडिंग टिप्सद्वारे गुंतवणूकदारांकडून १०४ कोटी रुपये कमावले होते.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत मोफत वाचा

कसे समोर आले प्रकणर?

अस्मिता पटेल यांच्याकडून चालवल्या जाणाऱ्या ग्लोबल स्कूल ऑफ ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेडमधून ट्रेडिंग शिकलेल्या काही गुंतवणूकदारांनी याप्रकरणी सेबीकडे तक्रार केली होती. तक्रारीनंतर चौकशीदरम्यान, सेबीला असे आढळून आले की, या संस्थेने ‘लेट्स मेक इंडिया ट्रेड’, ‘मास्टर्स इन प्राइस अ‍ॅक्शन ट्रेडिंग’ आणि ‘ऑप्शन्स मल्टीप्लायर’ सारखे सशुल्क अभ्यासक्रम सुरू केले होते. मात्र, संस्था हे अभ्यासक्रम शिकवण्याच्या नावाखाली केवळ ट्रेडिंग आणि गुंतवणूक सल्ला द्यायची.

सेबीच्या तपासात असे दिसून आले की, अस्मिता पटेल आणि त्यांच्या टीमने त्यांच्या अभ्यासक्रमांद्वारे गुंतवणूकदारांना विशिष्ट स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित केले. याचबरोबर त्यांच्या टेलिग्राम चॅनेलवर स्टॉक खरेदी आणि विक्रीसाठी सल्ले देण्यात आले होते. तसेच, या गुंतवणूकदारांना एका विशिष्ट ब्रोकरेज फर्ममध्येच खाते उघडण्यास सांगण्यात आले होते.

सेबीने केलेल्या चौकशीत पुढे असेही समोर आले की, या अभ्यासक्रमांतून मिळणारे शुल्क सागर धनजीभाई यांच्या किंग ट्रेडर्स, सुरेश परमाशिवम यांच्या जेमिनी एंटरप्राइजेस आणि जिगर रमेशभाई दावडा यांच्या युनायटेड एंटरप्राइजेस यासारख्या तृतीय-पक्ष संस्थांद्वारे फिरवले जायचे. याबाबत इकॉनॉमिक टाइम्सने वृत्त दिले आहे.

सिक्युरिटीज मार्केटमधून हकालपट्टी

सेबीने आपल्या अंतरिम आदेशात अस्मिता पटेल, त्यांचे पती जितेश जेटलाल पटेल आणि इतर चार संस्थांना गुंतवणूक सल्ला आणि विश्लेषक सेवा देण्यास मनाई केली आहे. यासह, या सहाही जणांना सिक्युरिटीज मार्केटमधून काढून टाकण्यात आले आहे. सेबीने अस्मिता पटेल आणि त्यांच्या कंपन्यांकडून संपूर्ण १०४ कोटी रुपये जप्त का करू नये याचे स्पष्टीकरण मागितले आहे. जर त्या उत्तर देऊ शकल्या नाहीत तर त्यांच्यावर आणखी कठोर कारवाई केली जाऊ शकते.

फिनइन्फ्लुएन्सर्सवर सेबीची कारवाई

अलिकडेच, गुंतवणूक शिक्षणाच्या नावाखाली स्टॉक टिप्स देणाऱ्या अशा फिनइन्फ्लुएन्सर्सवर सेबीने कठोर कारवाई केली आहे. डिसेंबरमध्ये ‘बाप ऑफ चार्ट’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या नसिरुद्दीन अन्सारीविरुद्धही कारवाई करण्यात आली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asmita patel option queen she wolf stock market penalized sebi 50 cr aam