गुवाहाटी : आसाममध्ये पूरपरिस्थिती अद्यापही बिकट आहे. या संकटाचा ४५ लाखांपेक्षा अधिक नागरिकांना तडाखा बसला असून गेल्या २४ तासांत आणखी सात जणांचा मृत्यू झाला. आता बळींची संख्या १०८ झाली आहे. ब्रह्मपुत्रा आणि बराक नद्यांचे पाणी शुक्रवारी ओसरत असले तरी त्यांच्या उपनद्या अद्यापही तुडूंब वाहत आहेत, असे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले. या आपत्तीत आतापर्यंत १०८ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये गेल्या २४ तासांतील सात बळींचा समावेश आहे.
बराक खोऱ्याचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या सिलचरचा बहुसंख्य भाग हा पाण्याखाली आहे, असे जिल्ह्यातील अधिकाऱ्याने सांगितले. आसाम आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एएसडीएमए) सांगितले की, पूरग्रस्त भागात विशेषत: कछार जिल्ह्यातील नागरिकांच्या मदतीसाठी अधिक जवान पाठवण्यात आले आहेत.
राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या २०७ जवानांसह आठ पथके इटानगर आणि भूवनेश्वरमधून दाखल झाली आहेत. तर दिमापूर येथून लष्कराचे १२० जवान नऊ नौकांसह सिलचरमध्ये दाखल झाले आहेत. कछरमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची पथके विमानाने दाखल झाली आहेत. बराक आणि कुषीयारा नद्यांना आलेल्या पूरामुळे छाचर, हलिकंदी आणि करीमगंज या जिल्ह्यांना अधिक फटका बसला आहे.
एक लाख हेक्टर शेती पाण्याखाली..
आसाममधील दोन लाख ८४ हजार नागरिकांनी ७५९ मदत छावण्यांमध्ये आश्रय घेतला आहे. पुरामुळे १७३ रस्ते आणि पुलांचे मोठे नुकसान झाले आहे. तर एक लाख ८६९ हेक्टर क्षेत्रावरील पीके पाण्याखाली आहेत. बक्सा, बारपेटा, विश्वनाथ, बोंगाईगांव, चिरांग आणि धुबरी जिल्ह्यात जमिनीची मोठी धूप झाली आहे.