उत्तर-पूर्वेकडील आसाम राज्यात इसिसबद्दलचे स्वारस्य दिवसेंदिवस वाढत चालले असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. माहितीच्या महाजालावर इसिसच्या छायाचित्रांना वाढता प्रतिसाद मिळत असल्याने आसाम पोलिसांनी आता इसिस या दहशतवादी संघटनेवर विशेष नजर ठेवली आहे.
आसाममध्ये धार्मिक मूलतत्त्ववादी असून राज्यात इसिसबद्दलचे स्वारस्य वाढत चालले आहे. इसिसच्या छायाचित्रांना वाढता प्रतिसाद मिळत आहे, असे आसामचे पोलीस महासंचालक खगेन शर्मा यांनी सांगितले.
माहितीच्या महाजालावर इसिसला कुतूहल म्हणून भरघोस प्रतिसाद मिळाला असेल, असे विचारले असता शर्मा म्हणाले की, अशा प्रकारच्या प्रतिसादाची टक्केवारी अल्प आहे.
गुप्तचर यंत्रणांनी अलीकडेच पाहणी करून राष्ट्रीय पातळीवर निष्कर्ष काढले, त्यानुसार जम्मू-काश्मीरनंतर इसिसबाबत स्वारस्य दाखविणाऱ्या राज्यांमध्ये आसामचा दुसरा क्रमांक आहे.
तथापि, आसाममध्ये आपण आतापर्यंत इसिसशी संबंधित कोणालाही पाहिलेले नाही, असे शर्मा यांनी या दहशतवादी संघटनेपासून राज्याला असलेल्या धोक्याबाबतच्या
प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले. आसाम पोलिसांचा गुन्हा अन्वेषण विभाग आणि राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संघटना यांचे इसिसच्या कारवायांवर बारकाईने लक्ष आहे, असे पोलीस महासंचालक म्हणाले.

Story img Loader